मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाकडे आपल्या कर्मचारी वसाहतींच्या स्वच्छतेसाठीही पैसा नाही. स्वच्छतेचा अभाव आणि देखभालीअभावी बेस्टच्या ३३ वसाहतींमधील कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटल्यानंतर स्वच्छता आणि देखभालीच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना दिले.बेस्टच्या कर्मचारी व कल्याण विभागाकडून वसाहतींमधील साफसफाई कामांसाठी केलेल्या कराराच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे बुधवारी मांडण्यात आला होता. भाजपचे सुनील गणाचार्य यांनी बेस्ट वसाहतींमधील दयनीय अवस्था निदर्शनास आणली. वसाहतीच्या स्वच्छतेसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात स्वच्छता झालेली दिसत नाही.महाव्यवस्थापकांसह वसाहतींचे दौरे करण्याची सूचना सदस्यांनी केली. कल्याण विभागाचा कोणताच अधिकारी तेथे जात नाही, वसाहतीतील जुने पंप खराब झाल्याने भविष्यात पाणी मिळणेही अवघड होईल, अशी चिंता सदस्यांनी व्यक्त केली.मात्र बेस्टच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे सफाईसाठी येणारा खर्च दर महिन्याला देण्यात येणार आहे. तसेच साफसफाईचे काम संस्थांकडून काढून घेऊन ते ठेकेदाराकडे देण्यात येईल, असे महाव्यवस्थापकांनी सांगितले.दुरुस्ती होते स्वखर्चाने६७ हजार ते ४४ लाख रुपयांपर्यंतचे सफाई कामाचे तीन वर्षांचे करार करण्यात आले. हे करार त्या-त्या वसाहतींच्या संघटनांबरोबरच करण्यात आले आहेत. वसाहतीच्या संघटनांना तुटपुंज्या रकमेत काम करणे परवडत नाही. मात्र त्यांचीच वसाहत असल्यामुळे सुरक्षेसाठी स्वखर्चाने काम करावे लागत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले.अर्धा निधी परत जात असल्याची तक्रारमहापालिका दरवर्षी १० कोटी रुपये बेस्ट उपक्रमाच्या वसाहतींच्या दुरुस्तीसाठी देत असते. मात्र स्वच्छतेसाठी आधी खर्च करा, नंतर पैसे मागा, अशी ताठर भूमिका प्रशासन घेत असते. कामगारांचा पगार देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे पैसे नसल्याने स्वच्छतेसाठी खर्च करू शकत नाही. त्यामुळे १० कोटी रुपयांमधील अर्धी रक्कम खर्च न होताच परत जाते, अशी तक्रार सदस्यांनी केली.
कर्मचारी वसाहतींच्या स्वच्छतेसह देखभालीसाठी तातडीने पावले उचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 2:19 AM