Join us

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:08 AM

मुंबई : आपत्तीकाळात नेमक्या कोणत्या प्राथमिक हालचाली करून आपत्तीचे निराकरण करावे याबाबत पालिकेमार्फत मार्गदर्शन केले जाते. नुकतेच मुंबईतील सार्वजनिक ...

मुंबई : आपत्तीकाळात नेमक्या कोणत्या प्राथमिक हालचाली करून आपत्तीचे निराकरण करावे याबाबत पालिकेमार्फत मार्गदर्शन केले जाते. नुकतेच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक यांना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास या प्रकारचे प्रशिक्षण देण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार मागील दोन दिवस हा उपक्रम राबविण्यात आला. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना या प्रशिक्षणात भाग घेता यावा यासाठी, शहर विभागातील मंडळांना परळ स्थित शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती.

पूर्व उपनगरातील मंडळांना घाटकोपर भटवाडी महानगरपालिका शाळा येथे आणि पश्चिम उपनगरातील मंडळांकरिता जोगेश्वरी (पूर्व) मधील नटवरनगर पालिका शाळेत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन करीत ही कार्यशाळा पार पडली. तिन्ही ठिकाणी प्रत्येकी ५० याप्रमाणे एकूण दीडशे पदाधिकारी व स्वयंसेवक यांना हे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.

असे होते प्रशिक्षण...

आपत्ती म्हणजे नेमके काय, धोके कसे ओळखावेत, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे व काय करू नये, आग लागल्यास त्वरित करावयाच्या उपाययोजना, अग्निशामकांचा वापर, प्रथमोपचार, जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती याबाबतचे सखोल प्रशिक्षण या कार्यशाळेमध्ये देण्यात आले.