मुंबई : आरोग्य विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवआरोग्य बाइक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून, महिनाभरात मुंबईतील २३२ रुग्णांना आपत्कालीन आरोग्यसेवा पुरविण्यात आल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी दिली.महिनाभरापूर्वी शिव आरोग्य अॅम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली होती. २ आॅगस्ट रोजी सुरू झालेल्या या प्रकल्पाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून, दीपक सावंत म्हणाले की, शहरात अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी ही सेवा उपयुक्त ठरली आहे. २३२ केसेसमध्ये प्रामुख्याने ३२ बेशुद्ध रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यात आले. त्याखालोखाल तापाचे १६, श्वास घेण्यात अडचण येत असलेले २५, हृदयविकाराचा त्रास जाणवणारे २४ तर पोटदुखीच्या १४ रुग्णांना वेळीच बाइक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचार देण्यात आले. चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४०, गोरेगाव फिल्मसिटी भागातून ३७, चिता कॅम्प भागातून ३०, अशोक टेकडी भागातून २६, नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४ अशा प्रकारे २३२ रुग्णांना सेवा देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.मालाड येथील एका ७० वर्षीय वृद्ध रुग्णास लकव्याचा त्रास होऊ लागल्याने, १०८ या क्रमांकावर कॉल करण्यात आला. बाइक अॅम्ब्युलन्सने तत्काळ घटनास्थळी पोहोचून रुग्णावर प्रथमोपचार केले. अशाच प्रकारे रुग्णांपर्यंत बाइक अॅम्ब्युलन्समुळे तातडीने पोहोचणे शक्य होते. अशा रुग्णांवर लगेच प्रथमोपचार करून, त्यांना पुढील उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात येते, अशी माहिती सावंत यांनी दिली. मुंबईत सध्या दहा ठिकाणी या बाइक अॅम्ब्युलन्सची सेवा कार्यान्वित आहे.
बाइक अॅम्ब्युलन्समुळे महिनाभरात २३२ रुग्णांवर तातडीने उपचार,आरोग्यमंत्र्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:27 AM