प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ बी. के. गोयल कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:09 AM2018-02-21T06:09:47+5:302018-02-21T06:09:53+5:30
प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मुंबई : प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा राहुल आणि संध्या, अलका, वर्षा या ३मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता बाणगंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. गोयल यांना सकाळी सव्वादहाच्या दरम्यान त्रास होऊ लागला आणि ते घरातच कोसळले. त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. गोयल हे बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्याचबरोबर जे.जे. ग्रुप आॅफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डिओलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, गायक अनुप जलोटा यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर, त्यांचे शिष्यगण यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
देशातील पहिले खासगी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसची सुरुवात त्यांनी बॉम्बे रुग्णालयात केली होती. कार्डिओलॉजी क्षेत्रातील प्रत्येक नवीन गोष्टींचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. अनेक गरीब रुग्णांवर ते मोफत उपचार करायचे.
हृदयरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. गोयल यांचे नाव राष्ट्रीय,
तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आदराने घेतले जाते. देशभरात त्यांचे सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी कार्यरत आहेत. केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.