आजोबा शरद पवारांना नातू रोहित पवारांचे भावनिक पत्र, केली एक विनंती...
By मोरेश्वर येरम | Published: December 12, 2020 04:59 PM2020-12-12T16:59:03+5:302020-12-12T17:01:49+5:30
रोहित पवार यांनी लिहिलेल्या तीन पानी पत्रात राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से मांडले आहेत. यासोबत अनेक आठवणींनाही उजाळा दिला आहे.
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांनी एक पत्र लिहीलं आहे. रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांना एक खास विनंती केलीय.
''तुमच्याकडं दांडगा अनुभव आहे. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याचदा तरुणांना भेटत असतो, त्यामुळं त्यांच्या अपेक्षा मला माहित आहेत. आपल्या दांडग्या अनुभवाची शिदोरी आज या तरूण वर्गाला शिकण्यासाठी हवीय. मग ती लेखाच्या अथवा पुस्तकाच्या माध्यमातून असो किंवा तरुणांसोबत संवाद साधण्याच्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, आपण ती द्यावी, अशी या तरुण वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे.", अशी भावना रोहित पवार यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी लिहिलेल्या तीन पानी पत्रात राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से मांडले आहेत. यासोबत अनेक आठवणींनाही उजाळा दिला आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब आपल्या वाढदिवसानिमित्त तुमच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचं मी सकाळी तुम्हाला दिलेलं पत्र राज्यातील जनतेसाठीही सादर करतोय.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2020
Respected Saheb, on your birthday, sharing a letter given to you in the morning. It’s my humble attempt to pen down my thoughts. https://t.co/QZCc0oHI0xpic.twitter.com/h9pGmMQeYb
तरुणांचा नेता
"तुमचा अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य संपूर्ण देशाला माहितच आहे. पण गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील तरुणांनी तुम्हाला जो उदंड प्रतिसाद दिला. तो अवर्णनीय असा होता. राजकारणातून चार हात दूर असलेल्या तरुणांसाठीही तुम्हा ऊर्जास्रोत आणि आदर्श बनलात", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांना पडला प्रश्न
"राज्यात महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून चांद्यापासून बांध्यापर्यंत वेगवेगळ्या कामांचा पाठपुरावा करताना मी आपल्याला पाहतो. या वयात काम करण्याचा तुमचा उरक पाहिला तर आपण कुठे आहोत, असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. आज वयाच्या ८० व्या वर्षीही १८ वर्षे वय असल्याप्रमाणे तुम्ही काम करता. लोकांसाठी अहोरात्र काम करत असताना तुमच्यात ही ऊर्जा नेमकी येते तरी कुठून?", असा प्रश्न रोहित पवारांनी पत्रात विचारला आहे.