लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप
By admin | Published: September 10, 2014 01:53 AM2014-09-10T01:53:40+5:302014-09-10T01:53:40+5:30
पुढच्या वर्षी लवकर येण्याचा वायदा घेऊन लाखो मुंबईकरांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला़
मुंबई : पुढच्या वर्षी लवकर येण्याचा वायदा घेऊन लाखो मुंबईकरांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला़ १० दिवसांच्या पाहुणचारानंतर वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले़ लालबागचा राजा व मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश गल्लीतील मूर्तीचे विसर्जन होण्यास आजची पहाट उजाडली़
गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मुंबईतील ७२ विसर्जनस्थळे व २७ कृत्रिम तलाव सज्ज ठेवण्यात आले होते़ गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सोमवारी दुपारपासून भक्तांचा महासागर चौपाट्यांवर लोटला होता़ त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे, निरीक्षण मनोरे, जीवरक्षक, तराफे, सर्च लाइट, फ्लड लाइट, कर्मचारी, प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था सर्व विसर्जन स्थळांवर ठेवली होती़ पालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू राहिले़ २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे सकाळी सहानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाले़ आज सकाळपर्यंत मुंबईतील ४५ हजार ४५८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले़ यापैकी सार्वजनिक ८०५८, ३७ हजार २२७ घरगुती, १७३ गौरी आहेत़ कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक १०१ तर घरगुती २,०४८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले़ (प्रतिनिधी)