भावनिकतेच्या जोरावर गड शाबूत
By admin | Published: April 16, 2015 01:21 AM2015-04-16T01:21:58+5:302015-04-16T01:21:58+5:30
राज्याचे लक्ष लागून राहिलेला वांद्रे (पूर्व) विधानसभा निकाल शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्या विजयापेक्षा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवामुळे अधिक चर्चेत राहणार आहे.
जमीर काझी - मुंबई
राज्याचे लक्ष लागून राहिलेला वांद्रे (पूर्व) विधानसभा निकाल शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्या विजयापेक्षा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवामुळे अधिक चर्चेत राहणार आहे. विधानसभेच्या पराभवानंतर सक्रिय राजकारणात ‘कमबॅक’साठी नारायण राणे पूर्ण शक्तिनिशी उतरले होते. पण मातोश्रीच्या अंगणात चारीमुंड्या चित व्हावे लागल्याने त्यांची राजकीय कारकीर्द संपली नसली, तरी मोठा अल्पविराम मिळणार हे निश्चित आहे. त्याउलट भाजपासोबत सत्तेत राहूनही वेळोवेळी त्यांच्याशी पंगा घेणाऱ्या शिवसेनेसाठी हा विजय आत्मविश्वास उंचावणारा आहे. काही दिवसांवर आलेल्या नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी हा विजय कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे.
पोटनिवडणुकीत राणे सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरले होते. एमआयएम वगळता राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र त्यांची ही जिगर मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरली. पाच महिन्यांच्या फरकाने त्यांचा पुन्हा मोठा पराभव झाला आहे. जेमतेम ३८.८६ टक्के मतदान होऊनही सेनेची परंपरागत मते आणि त्याला भाजपा, रिपाइंची काही प्रमाणात साथ मिळाल्याने तृप्ती सावंत विजयी ठरल्या. मातोश्रीला आव्हान देण्याची भाषा राणे यांना नडली. तर विकासाच्या प्रश्नावरील प्रचाराला सेनेने तृप्ती सावंत यांच्यासाठी दिलेली भावनिक हाक मोलाची ठरली. गोवंश हत्याबंदी, मुस्लीम आरक्षण रद्द यासारखे अल्पसंख्याक समाजाला दुखावणारे निर्णय आणि भूसंपादन विधेयक, अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष या मुद्यांवर काँग्रेसने विरोधी जनमत एकवटण्याचा प्रयत्न केला. पुढच्या दोन वर्षांत मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे राजकीय भविष्य वर्तवून वांद्रेपासून परिवर्तनाला सुरुवात करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. विखुरलेली मुंबई कॉँग्रेस राणेंच्या निमित्ताने एकत्र आली. सेनेच्या तृप्ती सावंत यांना पक्षांतर्गत विरोधाबरोबरच मित्रपक्षाकडून फारशी मदत मिळणार नसल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रचाराचे पद्धतशीर नियोजन सगळ्यांना पुरून उरले. ‘विकासाच्या मुद्यावर बोलण्यापेक्षा राणे मातोश्रीच्या अंगणात येऊन आव्हान देत आहेत’, ‘बाळा सावंत यांच्या विधवा पत्नीशी सामना करीत आहे’, असे भावनिक आवाहन करत ठाकरेंनी मतदारांना आपलेसे केले. ८५ हजारांवर निर्णायक मुस्लीम मतदार असलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी एमआयएमच्या रहेबर खान यांनी २३ हजारांवर मते घेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र एमआयएमला मुस्लीम मतदारांनी नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
वांद्रे पूर्व निवडणुकीच्या निकालाने राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र नारायण राणेंच्या महत्त्वाकांक्षेला थोडी मुरड बसणार आहे. पोटनिवडणुकीतील पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वत:वर घेतली. असे असले तरी काही दिवसांनंतर ते कोणती भूमिका घेतात, कॉँग्रेस त्यांना महत्त्व देऊन विधान परिषदेवर संधी देईल का, यावर त्यांच्या राजकारणाची दिशा ठरेल. तर शिवसेनेला या विजयामुळे आत्मविश्वास मिळाला आहे. यापुढेही त्यांचा भाजपाबरोबर केंद्रात आणि राज्यात संसार सुरू राहील. सोयीनुसार विविध मुद्यावर विरोध दिसून येईल, अशी चिन्हे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते अधिक प्रकर्षाने दिसून येईल, एवढे मात्र नक्की !