नियमांच्या कचाट्यात पेटते भावनांची चिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:54 AM2018-07-19T04:54:44+5:302018-07-19T04:54:50+5:30
आप्त गेल्याचे दु:ख, कुटुंबाच्या करुण किंकाळ्या, अंधारलेल्या कोंडवाड्यात मृतदेहाचा शोध, दुर्गंधीत प्रियजनाचा मृतदेह मिळविण्यासाठी ८-१० तास ताटकळत बसलेले हतबल कुटुंब...
- स्नेहा मोरे
मुंबई : आप्त गेल्याचे दु:ख, कुटुंबाच्या करुण किंकाळ्या, अंधारलेल्या कोंडवाड्यात मृतदेहाचा शोध, दुर्गंधीत प्रियजनाचा मृतदेह मिळविण्यासाठी ८-१० तास ताटकळत बसलेले हतबल कुटुंब... तर दुसऱ्या बाजूला अर्जांच्या औपचारिकतेसाठी धावपळ करणारे कुटुंबातील काही सदस्य... काळजाचा ठाव घेणारे हे चित्र पाहायला मिळते, ते मुंबई शहर-उपनगरातल्या पालिका रुग्णालयांतील शवागरांमध्ये. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील एका प्रकरणात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यासाठी होणारी दिरंगाई टाळण्याविषयी महत्त्वाचा निर्णय दिला. त्या पार्श्वभूमीवर शहर-उपनगरातल्या पालिका रुग्णालयांतील शवगारांत ‘रिअॅलिटी चेक’ केले असता, नियमांच्या कचाट्यामुळे मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यासाठी सहा-सात तासांहून अधिक कालावधी लागत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय, नायर, कूपर, भाभा, व्ही. एन. देसाई, सिद्धार्थ रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथील शवागरांची स्थिती दयनीय आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनापासून ते तो मिळेपर्यंत कुटुंबातील सदस्यांना प्रियजनाच्या मृत्यूच्या दु:खाला कसेबसे आवरत, प्रचंड धावपळ आणि अर्ज पूर्ततेचे सोपस्कार करावे लागतात. नियम महत्त्वाचे असले, तरीही यावर तोडगा काढून दु:खातील कुटुंबाची परवड थांबविण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी राजावाडी रुग्णालय शवागाराबाहेर सात तास प्रियजनाच्या मृतदेहाच्या प्रतीक्षेत असणाºया जर्नादन नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाइकांना अर्ज पूर्ततेसाठी धावपळ करायला लावणे चुकीचे आहे. त्या वेळेस कुटुंबाची तशी मानसिकता नसते, त्यामुळे मृतदेह सोपविण्याची प्रदीर्घ प्रक्रिया कमी करण्यासाठी उपाय योजावेत, अशी प्रतिक्रिया शीव रुग्णालयाच्या शवागाराबाहेर आपल्या नातेवाइकाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ९-१० तास वाट पाहणाºया गजेंद्र वाक्चौरे यांनी दिली. नायर रुग्णालयातील शवागारात १२ हून अधिक वर्षे असलेल्या कर्मचाºयाने सांगितले की, उपनगरांच्या तुलनेत शहरांतील पालिका रुग्णालयांतील आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण आहे. शवविच्छेदन कक्षातील कर्मचारीही त्या तुलनेत कमी आहेत. शवविच्छेदन प्रक्रिया जटिल असल्याने या वॉर्डमधून-त्या वॉर्डमध्ये, तसेच रुग्णालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे-घराच्या हद्दीतील पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाइकांना अर्जांसाठी फिरावे लागते. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
>कायदेशीर बाबी टाळता येत नाहीत
शवविच्छेदन हे फॉरेन्सिक आणि पॅथालॉजी अशा दोन प्रकारचे असते.
रुग्णालयात रुग्ण मृत झाल्यानंतर दोन तास मृतदेह वॉर्डमध्येच ठेवतात. त्यानंतर, शवविच्छेदनासाठी अर्जांची प्रक्रिया असते. मग पोलिसांकडून पंचनामा होतो. त्यामुळे त्या-त्या पोलीस ठाण्याहून पोलीस येईपर्यंतचा कालावधी जातो. शिवाय, रात्री रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करत नाही. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर विविध अर्जांची पूर्तता करणे बंधनकारक असते, त्यासाठी साधारण तासभर जातो. त्यामुळे बºयाचदा मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यासाठी लागणारा कालावधी वाढतो. या वैद्यकीय, कायदेशीर बाबी टाळता येत नाहीत, परंतु या एकंदर प्रक्रियेमुळे होणारा त्रास लक्षात घेता, भविष्यात निश्चितच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
- डॉ. अविनाश सुपे, पालिका प्रमुख रुग्णालये वैद्यकीय संचालक, केईएम अधिष्ठाता
>पोलिसांनाही मनस्ताप
एका बेवारस मृतदेहाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भाभा रुग्णालयात आलेल्या पोलिसाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, बºयाचदा बेवारस मृतदेहांसाठी पोलीस दलच वाली असते. अशा परिस्थितीत अर्जांसाठी अनेकदा रुग्णालयांत फेºया माराव्या लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो.