मुंबई: वांद्रे येथील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईतील अन्य किल्ल्यांची देखभाल करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी स्थायी समितीने केली आहे. त्यानुसार आता मुंबईतील पुरातन व प्रसिद्ध शिवडी किल्ल्याच्या सुरक्षा व परिरक्षणासाठी तत्काळ संस्था नेमण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिका प्रशासनाला दिले आहेत.राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे परिरक्षणासाठी तरतूद नसल्याने राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या शिवडी किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलाविण्याची मागणी स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापौरांकडे केली होती. त्यानुसार पालिका मुख्यालयातील महापौर दालनात यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीमधून संगोपनार्थ स्मारकाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.या स्मारकाच्या संगोपनार्थ १० वर्षांकरिता त्याचे पालकत्व घेता येईल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार शिवडी किल्ल्याचे पालकत्व स्वीकारण्याचा स्वतंत्र प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश महापौरांनी या वेळी दिले. या प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत शिवडी किल्ल्याचे परिरक्षण करण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नेमणूक करण्याचेही ठरले.या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त ए.एल. जºहाड आणि जयश्री भोज, राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सह आयुक्त परिमंडळ-२ नरेंद्र बरडे तसेच एफ / दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, पुरातन वास्तू जतन समितीचे संजय सावंत हे अधिकारी उपस्थित होते.ब्रिटिश काळात १६८० मध्ये शिवडी येथे किल्ला बांधण्यात आला आहे. पुरातत्त्व वास्तूच्या यादीत श्रेणी १ मध्ये या किल्ल्याची नोंद आहे. सध्या राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याची जबाबदारी आहे.वांद्रे येथील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दफ्तरी दाखल करण्यात आला आहे. केवळ एका किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याऐवजी मुंबईतील सर्वच किल्ल्यांबाबत प्रस्ताव आणण्याची सूचना सदस्यांनी केली.वांद्रे, वरळी, शिवडी, सायन, कर्नाळा, वसई, माहुली, कुलाबा, राजमाची, लोहगड आणि मुरुड-जंजीरा असे ११ किल्ले मुंबई व आसपासच्या परिसरात आहेत.
शिवडी किल्ल्याच्या सौंदर्यात पडणार भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 1:22 AM