मुंबई : मध्य रेल्वेने स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेवर भर दिला. यासोबतच स्थानक आणि शेडमधील गाड्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतागृहांतील स्वच्छतेबरोबरच गाड्यांमध्ये डस्टबिनची उपलब्धता आणि त्यातील कचऱ्याची विल्हेवाटदेखील लावण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गाड्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रेनमधील शौचालयांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची तपासणी केली. लोकमान्य टिळक टर्मिनसवरील विशेष गाड्यांची स्वच्छताही करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना खिडक्यांची व्यवस्थित साफसफाई आणि काचेच्या पाट्या पुसण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण गाडीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकात पुणे- लखनऊ विशेष ट्रेनचे फ्लोर क्लिनिंग, पॅनेल आणि शौचालये साफसफाईसाठी उच्च दाबाच्या पाण्याच्या बीमसह सखोल साफसफाई करण्यात आली. फ्लोरिंगच्या आणि डब्यांच्या बर्थसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक क्लिनरसह यांत्रिक सफाई करण्यात आली.
नागपूर विभागातील स्थानकांतील स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि कचरा विल्हेवाटीवर विशेष लक्ष देत गाड्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. कोपरगाव स्थानकात कर्नाटक एक्स्प्रेसची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण प्रभावीपणे हाती घेण्यात आले. देवळाली स्थानकात पनवेल-नांदेड विशेषची साफसफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आणि ख॓डवा स्टेशनवर शौचालय व वॉश बेसिनवर लक्ष केंद्रित करून इतर गाड्या स्वच्छ करण्यात आल्या. प्रवाशांना कागदी पिशव्या वाटण्यात आल्या आणि डस्टबिनच्या वापरासाठी समुपदेशन करण्यात आले.