Join us

यंदाही गणेशोत्सवात आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर; अतिरिक्त खर्च टाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 4:33 PM

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर आल्यामुळे आता मुंबईत गल्लोगल्ली गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. सरकारतर्फे गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर ...

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर आल्यामुळे आता मुंबईत गल्लोगल्ली गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. सरकारतर्फे गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर करण्यात आल्याने आता गणेशोत्सव मंडळही तयारीला लागले आहेत. मागच्या वर्षी कोरोनाने थैमान घातले होते. तसेच या वर्षीदेखील दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रकोप दिसून आला. त्यातच आता महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटना व महापुरामुळे दुहेरी संकटाचा सामना महाराष्ट्र करत आहे. हेच लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सवदेखील साधेपणाने साजरा करण्यावर गणेशोत्सव मंडळांचा भर असणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्याचा मंडळाचा मानस आहे. तसेच गणेशोत्सवात अतिरिक्त खर्च टाळून ती रक्कम महाराष्ट्रातील पूरग्रस्त व दुर्घटनाग्रस्त गावांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळ आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. गरजवंतांना मदत हेच ध्येय ठेवून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांच्या लसीकरणावरदेखील भर देण्याचे अनेक मंडळांचे म्हणणे आहे. यंदाचा गणेशोत्सवदेखील आरोग्य उत्सव आणि मदत उत्सव म्हणूनच साजरा केला जाणार असल्याचे चित्र आहे.

सरकारने गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. त्याच नियमांप्रमाणे आता गणेशोत्सव साजरा केला जाईल. यंदा गणेशोत्सवाचे स्वरूप कसे असेल? काय करायचे? यासंदर्भात येत्या काही दिवसात बैठक होणार आहे. सध्या तरी आम्ही मंडळाचे सर्व कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाड, चिपळूण व कोल्हापूर येथे कार्यरत आहोत. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येईल.    - स्वप्निल परब (सरचिटणीस, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली)

यंदाच्या गणेशउत्सवासंदर्भात आमची बैठक पार पडली, त्यानुसार आता आम्ही आरोग्यविषयक कार्यक्रम व गरजूंना अन्नधान्याची मदत यावर जास्त भर देणार आहोत. उंचीची मर्यादा असल्याने यंदा गणेशमूर्ती छोटीच असणार आहे. मंडळाने यावर्षी कोणतीही मिरवणूक रोषणाई न करण्याचे ठरविले आहे. तसेच मंडपाच्या शेजारीच कृत्रिम तलावात त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.  - आदिनाथ सावंत (खजिनदार, नवतरुण गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर) 

टॅग्स :गणेशोत्सव