Join us

सेवासुविधांसह हवा शुद्ध ठेवण्यावर भर; प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 1:25 AM

पायाभूत सुविधा/पर्यावरण

मुंबई : कोरोनामुळे तब्बल नऊ महिने लांबलेले पायभूत सेवासुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासह मुंबईची हवा समाधानकारक ठेवण्यावर मुंबईकर आणि प्रशासनाला जोर द्यावा लागणार आहे. पायाभूत सेवासुविधा प्रकल्पांमध्ये मोनो, मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासोबत उर्वरित प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनावर असणार आहे. 

मुंबईत सुरू असलेल्या पुलांची कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार असून, मेट्रो - २ अ आणि मेट्रो - ७ रुळावर आणण्यासाठी एमएमआरडीएचा कस लागणार आहे. मुंबई महापालिका असो, एमएमआरडीए असो किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असो, अशी सर्वच प्राधिकरणे नागरिकांच्या नव्या वर्षातील अपेक्षा पूर्ण करण्यावर  कितपत जोर देतात याकडे सर्वांचेच लक्ष असून, येथे सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे मुंबईचा वेग वाढेल का? ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात येणार का, असे अनेक प्रश्न असले तरी या अपेक्षा नव्या वर्षाकडून नागरिकांच्या आहेत.

---धारावी पुनर्विकासधारावी पुनर्विकास प्रकल्प विविध कारणांमुळे लांबणीवर पडत आहे. प्रश्न सुटण्याऐवजी गुंता वाढत आहे. त्यामुळे नव्या वर्षात तरी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा नारळ फुटणार का? सरकार काही करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा धारावीकरांना आहे.

समस्यांची मगर‘मिठी’ सुटण्याची अपेक्षा 

मिठी नदीलगतच्या क्रांतिनगरमधील रहिवाशांचे पुनर्वसन नव्या वर्षात तरी होणार का? मिठी नदी साफ होणार का? पावसाळ्यात पुन्हा घरात पाणी शिरणार का? की  पुढील काही वर्षे पुन्हा येथेच वास्तव्य करावे लागणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळतील, अशी अपेक्षा क्रांतिनगरमधील रहिवाशांना आहे.

म्हाडाची लॉटरी

गोरेगाव येथे म्हाडाकडून ४ हजार घरे बांधली जात आहेत. या घरांपैकी २ हजार घरे लॉटरीसाठी असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र म्हाडाकडील माहितीनुसार येथील घरांचे बांधकाम हे अगदीच प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे नव्या वर्षात निघणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीसाठी अधिकाधिक घरांची अपेक्षा नागरिकांना म्हाडाकडून आहे.

प्रदूषण कमी होणार!

मुंबईत ठिकठिकाणी प्रकल्पांचे काम सुरू आहे. इमारती उभ्या राहत आहेत. यातून धूळ उठत असून वातावरण प्रदूषित होत आहे. पण हे प्रदूषण कसे कमी होईल याकडे सरकार लक्ष देईल आणि मुंबईची हवा समाधानकारक नोंद होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

टॅग्स :म्हाडापर्यावरण