मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दस्तावेजावर भर; विलंब टाळण्यासाठी वेगाने काम करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:00 AM2024-02-28T08:00:45+5:302024-02-28T08:00:56+5:30
पाठपुरावा समितीतील सदस्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच पाठपुरावा समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून २०१३ साली केंद्र शासनाकडे पाठविलेल्या अहवालाचे पुन्हा एकदा योग्य दस्तावेजीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. शिवाय, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी होणारा विलंब कमी करून ध्येयपूर्तीसाठी समिती वेगाने काम करणार असल्याची माहिती समितीतील सदस्यांनी दिली आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी सादर करण्यात येणारा अहवाल केंद्र शासनाकडे आहे. त्यात मराठी आणि इंग्रजी भाषेत पुराव्यांसह सर्व निकषांची पूर्तता करण्यात आली आहे. मात्र, तरीही याला होणारा विलंब कोणत्या कारणांमुळे आहे, याची कारणमीमांसा करण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी या विषयाबाबत काम केलेल्या दिग्गजांचे कार्य पुढे नेत उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष रणनीती आखण्यावर समितीतील सदस्यांचा भर असेल, अशी माहिती पाठपुरावा समितीचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
यादवकाळापासून मराठी भाषा
मराठी भाषेचा आदिकाल यादवकाळापासून आहे. त्यामुळे महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी भाषा आहे. चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रातही मराठी भाषा आढळून येते, हेसुद्धा विशेष आहे.
अशा सर्व मुद्द्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिली आहे.
इतर भाषांच्या निकषांची पूर्तता
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी यापूर्वी सादर केलेला अहवाल अधिक प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे. त्यासाठी कशा पद्धतीने काम करता येईल, याबाबत समितीतील तज्ज्ञ विचारमंथन करणार आहेत.
ज्या भाषांना यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यांची निकष पूर्तता आणि अहवालात काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यावर मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती समितीतील सदस्य सरहद संस्थेचे संजय नहार यांनी दिली.
पाठपुरावा समितीची २८ फेब्रुवारीला ऑनलाइन बैठक होणार आहे, या बैठकीनंतर समितीच्या कामाचे स्वरूप ठरणार आहे. मागील काही वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांनंतर मराठी भाषा अभिजात आहे हे आता तज्ज्ञांनी मान्य केले आहे. तेव्हा मराठी भाषेचा अभिमान बाळगताना आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना, त्याच वेळी ती ज्ञानभाषा व्हावी. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी भाषेविषयी आदर निर्माण होण्याची जास्त गरज आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषेसाठी अधिकाधिक विस्ताराने सर्वसमावेशक धोरणे राबविण्याचा मानस आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख,
सदस्य, पाठपुरावा समिती