पर्यावरण जोपासत मुंबईच्या शाश्वत विकासावर भर; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 09:48 AM2022-03-13T09:48:32+5:302022-03-13T09:50:02+5:30

गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील उड्डाणपुलांचे भूमिपूजन

Emphasis on sustainable development of Mumbai while preserving the environment | पर्यावरण जोपासत मुंबईच्या शाश्वत विकासावर भर; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

पर्यावरण जोपासत मुंबईच्या शाश्वत विकासावर भर; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

Next

मुंबई : महानगरातील वनवैभव जपू्न नागरिकांच्या गरजा लक्षात घेत मुंबईत विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविले  जात आहेत, असे प्रतिपादन  पर्यावरण  व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केले. गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत प्रस्तावित  उड्डाणपुलाचे भूमिपूजन भांडूप (प) येथील हेडगेवार जंक्शनजवळील  गोदावरी धोंडीराम पाटील मैदानात झाले. हा प्रकल्प पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या जोडरस्त्याने मुंबई उपनगरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा चौथा जोडरस्ता उपलब्ध होणार आहे.

यावेळी ठाकरे म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याखालून बांधण्यात येणाऱ्या या भूमिगत मार्गाची बांधकाम प्रक्रियादेखील पूर्णपणे जमिनीखालीच खोलवर करण्यात येणार आहे. त्यामुळे  पर्यावरणाला, वृक्षाला व प्राण्यांना कोणताही त्रास होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा)  राजेंद्रकुमार तळकर, उपायुक्त (परिमंडळ ६) देविदास क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त  अजितकुमार आंबी यांच्यासह परिसरातील  नागरिक  उपस्थित होते.

जोड रस्त्याच्या कामासाठी ६६६ कोटी खर्च

मुंबई मेट्रो-४ च्या खालच्या पातळीवर म्हणजे पहिल्या स्तरावर ‘जीएमएलआर’ उड्डाणपूल प्रस्तावित आहे. तर हेडगेवार चौक येथे १२० मीटर पूल ‘केबल स्टे’ स्वरुपाचा आहे. या दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी तब्बल ६६६.०६ कोटी खर्च येणार आहे. तीन वर्षांत त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. या दोन्ही पुलाचे बांधकाम, एक स्तंभावर पूर्व निर्मित प्रबलित काँक्रिटचे सेगमेंटल बॉक्स गर्डर वापरून करण्यात येणार आहे. 

Web Title: Emphasis on sustainable development of Mumbai while preserving the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.