Join us  

मान्सूनपूर्व बैठकांवर जोर

By admin | Published: May 24, 2014 2:07 AM

ऐन पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये आणि मुंबईकरांचा रोष ओढावू नये म्हणून महापालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व बैठकांवर जोर दिला आहे.

मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये आणि मुंबईकरांचा रोष ओढावू नये म्हणून महापालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व बैठकांवर जोर दिला आहे. प्रत्यक्षरीत्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील नाले, मिठी नदी, रस्ते, खड्डे आणि रस्त्यांवरील चर अशा सर्व कामांची दुरुस्ती करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. नालेसफाईची कामे एप्रिलपासून हाती घेण्यात आली. ही कामे ६० टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर रस्त्याची दुरुस्ती आणि रस्त्यावरील चर बुजविण्याची डेडलाइन संपली असली तरी मेच्या अखेरीस ही कामेदेखील शक्य होतील तेवढी करण्यावर पालिका प्रशासनाचा भर आहे. उरलेल्या रस्त्यांची दुरुस्ती मात्र पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे, असेही पालिकेने सांगितले. विशेषत: रस्त्याच्या दुरुस्तीच्या पाहणीसाठी महापौर सुनील प्रभू हे रस्त्यावर उतरले आहेत. तर पालिका आयुक्त सीताराम कुंटे नालेसफाईच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत. मिठी नदीच्या साफसफाईहून महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात वाद असला तरी नवनिर्वाचित खासदारांनी थेट मिठी नदीच्या साफसफाईवर लक्ष केंद्रित केल्याने कामालाही वेग येणार आहे. दरम्यान, बगिच्यांचा विकास, पवई तलावातील लेझर शो, पक्षी उद्यान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ नायगाव येथे हुतात्मा पार्क, जिजामाता उद्यानात पेंग्विन पार्क, मुंबई शहरातील वाय-फाय सुविधा, मोबाइल-गव्हर्नन्स अशा विविध प्रकल्पांवरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले असून, ते वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.