प्रसिद्धीच्या हव्यासापेक्षा पुनर्वसनावर जोर दिला, तर गरिबांचे आशीर्वाद लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:22+5:302021-07-20T04:06:22+5:30
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरातून वाहणाऱ्या मिठी नदीलगतच्या रहिवाशांना शनिवारी आणि रविवारी भरलेली धडकी सोमवारीदेखील कायम होती. कारण ...
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरातून वाहणाऱ्या मिठी नदीलगतच्या रहिवाशांना शनिवारी आणि रविवारी भरलेली धडकी सोमवारीदेखील कायम होती. कारण शनिवारी रात्री पडलेल्या पावसाने मिठी नदीलगत वास्तव्य करत असलेल्या क्रांतीनगरमधील रहिवाशांच्या घरात पाणीच पाणी शिरले होते. शनिवारची रात्र या रहिवाशांनी जागून काढली आणि रविवारी रात्री या रहिवाशांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. मात्र भविष्यात असे दिवस पुन्हा बघायचे नसतील तर चहा आणि बिस्कीट घेऊन इथे येत, त्याचे वाटप करताना ते फोटो काढत, ते समाजमाध्यमांवर अपलोड करणे ऐवजी लोकप्रतिनिधींनी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनावर भर दिला, तर हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असा आशावाद रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
नशीब बलवत्तर आणि वरुण राजाने कृपा केल्याने रविवारी रात्री पावसाचा जोर कमी राहिला. सोमवारीदेखील पावसाने बऱ्यापैकी हात आखडता घेतला. परिणामी क्रांतीनगरमध्ये रहिवाशांची तात्पुरती का होईना या समस्येतून सुटका झाली. केवळ मिठी नदी नाही, तर विमानतळ प्राधिकरणाच्या भूखंडावर वसलेल्या अनेक झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुटलेला नाही.
विलेपार्ले, मरोळ, सांताक्रुझ येथील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटावा म्हणून लोकप्रतिनिधी लक्ष घालत असले तरी कुर्ला पश्चिमकडे मात्र याबाबत पुरेशी कार्यप्रणाली राबविली जात नसल्याचे चित्र आहे. याचा फटका क्रांतिनगरमध्ये राहत असलेल्या नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात बसत असून, मिठी नदीचे पाणी त्यांच्या घरात दिवसा आड येत असल्याचे चित्र आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा समन्वय महत्त्वाचा
केवळ मोठा पाऊस पडला म्हणजे घरात पाणी येते, असे होत नाही तर जेव्हा जेव्हा मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढते तेव्हा क्रांतीनगरमधील छोटे नाले बंद होतात. रहिवाशांच्या घरात जमिनीतून पाणी वर येऊ लागते. हा अनुभव येथील रहिवाशांना आज येतो आहे, असे नाही. प्रत्येक पावसाळ्यात येथील रहिवाशांना या समस्येला सामोरे जावे लागते. यावर आता एकच पर्याय आहे तो म्हणजे येथे वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महापालिका आणि विमानतळ प्राधिकरण यांनी एकत्र येत समन्वयाने काम केले पाहिजे.