- डॉ. सुमती शहा, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोरोना प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी संशोधन, निदान, अचूकता, उपयुक्तता या सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली आहे. याचा विचार करून आरोग्य यंत्रणांनी या लसीच्या व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. तसेच, त्यासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी गतीने तरतूद करण्यात यावी. संक्रमणाच्या मोठ्या विस्तारानंतर उपलब्ध होणारी लस योग्य पद्धतीने वापरावी असे मत आहे.
औषध विक्रेत्यांनाही समाविष्ट करावे
- अनिकेत चव्हाण, औषध विक्रेता, भांडुप
कोरोनाच्या सुरुवातीच्या संक्रमणापासून या लढ्यात औषध विक्रेत्यांचीही भूमिका महत्त्वाची राहिली आहे. बऱ्याचदा आम्हालाही संसर्गाचा धोका असूनसुद्धा आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी आम्ही रुग्णांच्या सेवेत कटिबद्धपणे काम करत आहाेत, या योगदानाचा विचार करून यंत्रणांनी लसीकरणासाठी औषध विक्रेत्यांचाही विचार करावा.
लसीच्या किमतीचाही विचार व्हावा
- श्रेया माणिक, आरोग्य चळवळीतील कार्यकर्त्या
लसीच्या किमतीचा प्रश्नही स्वाभाविक आहे, केंद्र यासंदर्भात राज्यांशी बोलत आहे. सार्वजनिक आरोग्यास प्राधान्य देण्यात यावे. भारत आज त्या देशांपैकी एक आहे जिथे दररोज अधिक चाचण्या केल्या जात आहेत. रिकव्हरीचे प्रमाण जास्त आणि मृत्यूचे प्रमाण कमी अशा देशांपैकी भारत एक आहे. कोरोनाविरुद्ध आम्ही ज्या प्रकारे लढा दिला त्यावरून प्रत्येक देशवासीयाची इच्छा दर्शविली जाते. विकसित देशांच्या तुलनेत भारताने युद्ध चांगल्या पद्धतीने लढले आहे. त्यामुळे प्रत्येक सामाजिक-आर्थिक स्तरातील व्यक्तीला लसीकरण प्रक्रियेविषयी आशा वाटते आहे, या सर्वांचा विचार केला पाहिजे.
प्रायोगिक टप्पा सुरू करावा
- डॉ. प्रदीप खोत, मधुमेहतज्ज्ञ
लसीच्या व्यवस्थापन आणि वितरणासाठी असलेले डिजिटल व्यासपीठ सज्ज आहे, त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर लसीचे वितरण राबवावे. प्रायोगिक तत्त्वावर यश मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीची उपलब्धता आणि मानवी चाचणी सुरू कऱण्यात यावी. लसीकरण मोहिमेची लवकर अंमलबजावणी करण्यासाठी वेगवान नियामक मंजुरी आणि वेळेवर खरेदीसाठी कालबद्ध योजना तयार करावी.
लसीकरण पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करावे
- डॉ. अभिज्ञा शहा, श्वसनविकारतज्ज्ञ
प्रथम उपलब्ध होणाऱ्या लसीचे प्रशासकीकरण, करण्याच्या उद्देशांवर आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि अग्रभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलन, कोल्डचेनमध्ये वाढ करणे यावर भर दिला पाहिजे.
लसीकरण पुरवठा साखळी सुधारित केली जात आहे. लसीकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणे ही बाब कौतुकास्पद आहे. लसीकरण उपक्रमाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये वैद्यकीय आणि नर्सिंगचे विद्यार्थी तसेच शिक्षकही सहभागी होणार आहेत. प्राधान्यक्रमाच्या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक ठिकाणापर्यंत ही लस पोहोचेल, हे सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक पावले टाकली जात आहेत.
लसीकरणाचा आनंद मात्र त्रिसूत्री महत्त्वाची
- रोहिणी घोंगे, वरिष्ठ परिचारिका
मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि स्वच्छता सुनिश्चित करणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कोणतीही शिथिलता आणून चालणार नाही. त्यामुळे इतके महिने या विषाणूसोबत संघर्ष केल्यानंतर लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली याचा आनंद आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची अन्य मार्गदर्शक तत्त्वेही पाळायला हवीत, जेणेकरून आपल्यासह समाजही सुरक्षित राहील आणि लवकरच आपल्याला या विषाणूशी लढण्याचा सशक्त मार्ग सापडेल.
विम्याची तरतूद महत्त्वाची
- डॉ. रक्षा देशमाने, मेंदूविकारतज्ज्ञ
लसीकरणाच्या प्रक्रियेत सुरुवातीला येणारे घटक आरोग्य कर्मचारी आहेत, ही समाधानकारक बाब आहे. मात्र लसीकरण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच या क्षेत्रातील सर्व व्यक्तींच्या विम्याची योग्य तरतूद असणे महत्त्वाचे आहे. कारण देशभरातील आरोग्य कर्मचारी हे वेगवेगळ्या समाज घटकांतील आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत परिणाम लक्षात घेऊन जिल्हास्तरीय, तालुकास्तरावर विमाविषयक उपाययोजनांसाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे.
आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वांचा विचार व्हावा
- परेश मयेकर, रुग्णवाहिका चालक
कोरोना विषाणूचे संक्रमण सुरू झाल्यापासून डॉक्टर, परिचारिकांसह आरोग्य सेवा क्षेत्रातील अन्य घटकही तितक्याच सातत्याने लढा देत आहेत. मार्च महिन्यापासून कुटुंबापासून काहीसे दूर राहून रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी झटत आहोत, अशा स्थितीत प्रत्येक वेळी संसर्ग होईल याची भीती राहते. कुटुंबाच्या भविष्याची चिंता भेडसावत असते, त्यामुळे अन्य घटकांसह आमचाही लसीकरण प्रक्रियेकरिता प्राधान्याने विचार कऱण्यात यावा.
सामान्य नागरिकांमध्ये ठरवावा प्राधान्यक्रम
- सुचिता म्हात्रे, परिचारिका
आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण दिल्यानंतर सामान्य नागरिकांना करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठीही प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. कोरोना प्रतिबंधक लसीकरिता सर्व स्तरांतून मागणी आहे. त्यामुळे या घटकांचा विचार करतानाही यंत्रणांनी विविध गट करावेत, त्यात मग अतिजोखमीचे आजार, लहान मुले, गर्भवती अशा स्वरूपात विचार करता येईल. जेणेकरून, लसीची उपलब्धता आणि उपयुक्ततेचे परीक्षण करणेही सोपे जाईल.
आम्हालाही हवा हक्क
- राजेंद्र येंदे, स्मशानभूमीतील कर्मचारी
कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र आता लसीकरण करताना या घटकाचा यंत्रणांनी विचार केला नाही. आराेग्य सेवा क्षेत्रातील साखळीत महत्त्वाचे योगदान देऊनही हा घटक वंचित राहिला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या इतक्या महिन्यांच्या काळात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीही अहोरात्र काम केले आहे. त्यामुळे लसीकऱण करण्यासाठी आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचाही विचार केला पाहिजे, लसीकऱण हा आमचाही हक्क आहे.
लसीची अचूक उपयुक्तता जाहीर करावी
- अतुल शिरसाट, क्ष-किरण विभागातील कर्मचारी
कोरोना संसर्गावर उपाय म्हणून विविध प्रकारच्या लसींचे संशोधन होत आहे. मात्र अजूनही यंत्रणांकडून लसीच्या उपयुक्ततेविषयी अचूक भूमिका नसल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात लस घेऊनही एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, अशा स्थितीत लसीकरण प्रक्रियेच्या सुरुवातीसाठी घाई करू नये. याउलट आरोग्य सेवा क्षेत्रात हा प्रयोग ठरावीक घटकात करून, पडताळून त्यानंतर लसीकरणाची अंमलबजावणी करण्यात यावी.
अचूक परीक्षणानंतरच व्हावा निर्णय
- प्रद्युक्त पोयरेकर, रेडिओलॉजिस्ट
कोरोना प्रतिबंधक लसीच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता देशात लवकरच लस उपलब्ध होणार आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र लसीकरण प्रक्रियेच्या अचूक परीक्षणावर भर दिला पाहिजे. नुकतेच केंद्रीय मंत्र्यांना लस देऊनही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अशा घटनांमुळे लसीविषयी विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. परिणामी, लसीच्या अचूक परीक्षणाकरिता सामायिक प्रोटोकॉल विकसित करण्यात साहाय्य, प्रशिक्षण, डेटा व्यवस्थापन प्रणाली, नियामक सादरीकरण, अंतर्गत आणि बाह्य गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली या सगळ्याचा विचार केला पाहिजे.
वेट अँड वॉचच्या भूमिकेत
- डॉ. राहुल वाघ, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड, महाराष्ट्र
मागील आठ महिने आम्ही सर्व डॉक्टर्स कोरोनाविरुद्धच्या लढाईत काम करत आहोत. हे काम करत असताना अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लस आल्यानंतर ती आम्हा डॉक्टरांना आधी मिळाल्यास काम करण्यास अधिक सोयीस्कर होईल. कोरोना लसीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ती आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांना कशा प्रकारे देण्यात येईल याबद्दल वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत.
हायरिस्क गटाला प्राधान्य द्यावा
- डॉ. समीर महाडिक, खासगी डॉक्टर, चेंबूर
ज्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती, अशा डॉक्टरांना कोरोनाची लस शेवटी मिळाली तरी हरकत नाही. सध्या जे ज्येष्ठ नागरिक हायरिस्कवर आहेत अशांना ही लस प्राधान्याने देण्यात यावी. मुंबईत अनेकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती अशांना सुरुवातीला लस देण्यात यावी.
लस आली तरी मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत
- डॉ. शिल्पा देशमुख, वरिष्ठ संचालक, सुश्रुषा रुग्णालय
कोरोनाची लागण होण्याची सर्वात जास्त शक्यता ही आरोग्य कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे. डॉक्टरांचे आरोग्य चांगले राहिले तरच ते सामान्य जनतेवर योग्य रीतीने उपचार करू शकतील. आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना ही लस दिल्यास त्यांचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहील. यासोबत सामान्य नागरिकांनी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.
औषध विक्रेत्यांचाही विचार व्हावा
- कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशन
सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरीही आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोनाबाधित रुग्णांशी संपर्क होत असतो. यामुळे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, फार्मसी यांना सर्वात आधी लस दिली पाहिजे. सरकारच्या वतीने देण्यात आलेला हा निर्णय अत्यंत योग्य आहे. आपल्या येथे कोरोनाचे अनेक रुग्ण हे केवळ भीतीमुळे दगावले आहेत. कोरोनाची लस दिल्यानंतर आपल्याला कोरोना होणार नाही याची अनेकांना शाश्वती असेल. यामुळे ते मानसिक ताणाखाली राहणार नाहीत.
लस सर्वांना द्यावी
- डॉ. रणजित माणकेश्वर, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय
कोरोनाच्या लसीसंदर्भात महानगरपालिका डॉक्टरांना सहकार्य करत आहे. त्यासाठी आम्ही महानगरपालिकेकडे डॉक्टरांची यादीही पाठविली आहे. लस आल्यानंतर ती डॉक्टरांना देण्यात येणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. आम्ही सर्व डॉक्टर लस घेण्यासाठी उत्सुक आहोत. अनेकांच्या हार्ड इम्युनिटीबद्दल अजूनही साशंकता आहे. त्यामुळे ही लस सर्वांनीच घ्यायला हवी.
सामान्यांनाही लस देण्यात यावी
- डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, के.ई.एम. रुग्णालय
सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्वात आधी कोरोनाची लस देण्यात येत आहे. हा शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अत्यंत स्तुत्य निर्णय आहे. सरकार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. डॉक्टरप्रमाणेच हळूहळू सामान्य नागरिकांनाही ही लस देण्यात येणार आहे. या लसीमुळे मानवी शरीरात किती प्रमाणात अँटिबॉडी तयार होतील याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे लस घेण्याबाबत उत्सुकता नाही.
उपयुक्ततेविषयी स्पष्टता हवी
- डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, राज्य पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन
कोरोनाची लस आल्यानंतर लसीकरणासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायलाच हवा. या लसीची उपयुक्तता अद्यापही निश्चित झालेली नाही, त्यामुळे ही लस हाच कोरोनावरील एकमेव उपाय असेल असे नाही. त्यामुळे लस उशिरा आली तरी चालेल, मात्र त्या लसीची उपयुक्तता तसेच लसीचे मानवी शरीरावर होणारे परिणाम याबद्दल स्पष्टता असायला हवी. अनेक डॉक्टरांमध्ये लस घेण्याबाबत उत्सुकता नाही.
लसीकरणानंतर कामात ऊर्जा येईल
- मयुरेश सरतापे, रुग्णवाहिका चालक, मानखुर्द
मला सुरुवातीच्या काळातच कोरोनाची लागण झाली होती. मी कोरोनाची लस घेण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या कुटुंबीयांनाही माझ्यासोबतच कोरोनाची लस मिळायला हवी. लस दिल्यानंतर रुग्णांची सेवा करण्याकरिता अजून हुरूप येईल.
लसीकरणाचे नियोजन महत्त्वाचे
- डॉ. हेमंत मोहिते, बी.एच.एम.एस., डॉक्टर
कोरोनाच्या लसीचे नेमके कोणते परिणाम आहेत हे शासनाच्या वतीने जाहीर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनंतर ती सामान्य नागरिकांमध्ये कशा प्रकारे दिली जाणार याचे नियोजन करणेही गरजेचे आहे. नागरिकांनी ही लस आवर्जून घ्यावी, परंतु निदान पुढील वर्षभर मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी पाळायला हव्यात.
लसीच्या उपयुक्ततेविषयी साशंकता
- चेतन कंठपुरे, रुग्णवाहिका चालक, शिवडी
कोरोनाची लस घेण्यासाठी मी अजिबात उत्सुक नाही. ही लस नेमकी किती प्रभावी आहे याबाबत सरकारकडे नेमकी आकडेवारी नाही. मुंबईसारख्या शहरात अर्ध्याहून अधिक लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. त्यामुळे ही लस किती उपयुक्त आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षिततेची भावना निर्माण होईल
- डॉ. अमित घरत, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस देण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. लस दिल्यामुळे डॉक्टर तसेच सोबतच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. त्यामुळे ते दुसऱ्या रुग्णांवर योग्यरीतीने उपचार करू शकतील. अनेक जणांना कोरोना होऊनसुद्धा त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहेत, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदाही कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे सर्वांनीच कोरोनाची लस घ्यायला हवी.
ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस द्यावी
- डॉ. आरिफ खान, खासगी डॉक्टर, गोवंडी
अनेक जण हार्ड इम्यूनिटीचे कारण देत लस घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. मात्र हार्ड इम्यूनिटी जास्त काळ टिकणार नसून पुन्हा कोरोना होऊ शकतो. शासनाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत हायरिस्कवर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस द्यावी. मी स्वतः ही लस घेण्यासाठी उत्सुक आहे.
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
- मनोज सणस, रुग्णवाहिका चालक, कलिना
कोरोनाची लस टोचून घ्यावी की नाही याबाबत अजूनही मी संभ्रमात आहे. लस घेतल्यानंतर शंभर टक्के कोरोनाची लागण होणारच नाही याबद्दल शाश्वती नाही. यामुळे लस घेणे किती फायद्याचे आहे हे कळत नाही. परंतु पुन्हा एकदा लॉकडाऊन आपल्या देशाला परवडणारा नाही. यामुळे शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून लस घ्यावी लागेल.