पालिका प्रशासनाचा निर्णय; सुरक्षारक्षक, सफाई कामगार, कचरा वेचकांसह सर्वांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संसर्ग नियंत्रणासाठी आता पालिका प्रशासनाने निवासी वसाहतींत कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता, मोलकरीण, वाहनचालक, सुरक्षारक्षक, माळी, सफाई कामगार, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, कचरा वेचक या सर्वांच्या तपासण्या करण्यात येतील.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आता तळागाळात जाऊन चाचण्या करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, परिसरातील स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याद्वारे निवासी वसाहतींकडे मोर्चा वळविला आहे, जेणेकरुन जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करता येतील आणि रुग्ण निदान झाल्यास त्यांना उपचाराच्या प्रक्रियेत लवकर आणता येईल. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी आणि जुहू या परिसरात अधिक रुग्ण असल्याने येथील निवासी वसाहती चाचणी शिबिरांसाठी पुढाकार घेत आहेत.
नुकतेच अंधेरी येथील अदानी वेस्टर्न हाईट्स येथील निवासी वसाहतीत ४५० घरांत कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जवळपास ७ ते ११ एप्रिलपर्यंत अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. पालिकेसह संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या या शिबिरात ५४४ नागरिक बाधित आढळले. तर अन्य ५४ जणांच्या अँटिजन चाचण्या केल्या, त्यात सात कोरोना बाधितांचे निदान झाले. पश्चिम उपनगरातील के. पश्चिम विभागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून या ठिकाणी एकूण ३६ हजार ३७५ रुग्ण आहेत. येथील सक्रिय रुग्णसंख्या ७ हजार ५१६ एवढी आहे.
* काेराेना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक!
मुलुंड हिलसाईड रेसिडन्ट वेल्फेअर असोसिएशनचे प्रकाश पड्डीकल यांनी सांगितले की, निवासी वसाहतींना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी चाचणी सक्तीने केली जात आहे. पालिकेसह संयुक्तपणे वसाहतींच्या आवारात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. या वसाहतींमध्ये काम कऱणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक आहे.