सुरक्षेवर भर द्या !
By admin | Published: January 16, 2016 02:06 AM2016-01-16T02:06:09+5:302016-01-16T02:06:09+5:30
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत असली, तरी त्यांच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. गेल्या दोन वर्षांत तर लोकलमधून प्रवास करणाऱ्या
मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत असली, तरी त्यांच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. गेल्या दोन वर्षांत तर लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांवर विनयभंग आणि चोरीसाठी हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीही महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी चोख बजावत असल्याचा दावा रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) केला जातो. ‘लोकमत’च्या महिला प्रतिनिधींकडून याविषयी करण्यात आलेल्या ‘रिअॅलिटी चेक’ला महिलांनी आणि सामान्य प्रवाशांनी दाद दिली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर अधिक भर द्या, अशी मागणी त्यांनी केली. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षेवर नक्की जास्त भर दिला जाईल, असे आश्वासन दिले.
‘लोकमत’ने रेल्वे सुरक्षेच्या रिअॅलिटी चेकद्वारे वास्तवावर प्रकाश टाकला. शासनाने किमान आता तरी दखल घ्यावी. रात्री उशिरा प्रवास करताना सुखरूप पोहोचू की नाही याची भीती असते. ती दूर व्हावी म्हणून रेल्वेकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- ज्योती म्हापार्ले, लालबाग
मुलीला कामावरुन घरी येण्यास १० जरी वाजले तरी भीती वाटते. कारण सुरक्षेबाबत मोठमोठ्या घोषणा करुन देखील अत्याचाराचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत आहे.
- वैशाली जाधव, दिवा
आजही रात्रीचा प्रवास महिलांना धोकादायक वाटतो. घरची मंडळी शक्यतो रात्रीचे लोकलने प्रवास करू देणे टाळतात. या रिअॅलिटी चेकने नागरिकांच्या व्यथा मांडल्या आहेत.
- निलम शेलार, चिंचपोकळी
मैत्रीणींसोबत घरी येण्यास उशिर झाला तरी घरचे रागावतात. त्यात रात्रीच्या प्रवासाला तर त्यांचा नेहमी रेड सिग्नल असतो. त्यामुळे शासनाने सुरक्षेत आणखी वाढ करणे गरजेचे आहे. त्यात रेल्वे हेल्पलाईनला माहिती मिळताच त्यांनी त्याची तत्काळ दखल घेणे तितकेच गरजेचे आहे.
- श्रृती निजापकर, कळवा
महिलांच्या सुरक्षेसाठी डब्यात एकच पोलीस तैनात असतो. अनेकदा तो ही नसतो. त्यामुळे यावर ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.
- ललिता साखरे, कल्याण
आम्ही रात्रीचा प्रवास शक्यतो टाळतो. सुरक्षेबाबत मोठ मोठी आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही.
- चित्रा जानस्कर, विलेपार्ले
रात्रीचा प्रवास म्हटला तरी अंगावर शहारे येतात. रात्री ९ ते १० च्या दरम्यान अनेकदा लोकलमध्ये पोलीस तैनात असतात. मात्र यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.
- मनीषा अहिरे, साकिनाका
महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांच्या सुरक्षेबाबत शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यांच्या हातात गंजलेली बंदुक असते. लुटारुंशी दोन हात करण्यासाठी ते सक्षम असणे गरजेचे आहे.
- प्रतिभा बर्वे, डोंबिवली