Join us

आरजी प्लॉटवर झोपड्यांमुळे पसरले घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:06 AM

मुंबई : अंधेरी पश्चिम चार बंगला, कामगार नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या आरजी प्लॉटवर विकासकाने त्याच्या कामासाठी एकूण ९० ...

मुंबई : अंधेरी पश्चिम चार बंगला, कामगार नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या आरजी प्लॉटवर विकासकाने त्याच्या कामासाठी एकूण ९० झोपड्या बांधल्या होत्या. त्यापैकी सध्या ४० झोपड्यांमध्ये कामगार राहात आहेत. या झोपड्यांमुळे येथे दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या झोपड्यांवर कारवाई करून येथील आरजी प्लॉट आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, याठिकाणी एसआरए अंतर्गत २००२मध्ये इमारत क्रमांक १ आणि २००४मध्ये इमारत क्रमांक २ पूर्ण होऊन ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले. एसआरए प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असल्याने एसआरए, विकासक, आरजी प्लॉट हा उद्यानासाठी आरक्षित असे तीन भाग करण्यात आले. या झोपड्या खाली करून या आरजी प्लॉटवर उद्यान विकसित करावे, यासाठी येथील नागरिक गेली दहा वर्षे अंधेरीत लढा देत आहेत.

याप्रकरणी या प्रकल्पाचे बांधकाम करणाऱ्या भोजवानी बिल्डरच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, प्रकल्प अंशतः पूर्ण झाला असून, सध्या प्रकल्प सुरु आहे. आरजी प्लॉटवर कोणतेही अतिक्रमण किंवा झोपडपट्टी नाही. एसआरए नियमांनुसार प्रकल्प पूर्ण झाल्यावर आरजी प्लॉट सोसायटीला देण्यात येईल. याप्रकरणी अंधेरी पश्चिमचे स्थानिक भाजप आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मी स्वतः एसआरएला यापूर्वी पत्रव्यवहार केला होता आणि याठिकाणी भेट दिली होती. या आरजी प्लॉटवर झोपड्या अस्तित्वात आहेत. या झोपड्यांवर कारवाई करा, अशी मागणी आपण एसआरएला केली होती. परंतु, कोरोनामुळे यावर कारवाई झाली नाही.