लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ मोजक्या मोबाइल टॉवर्सना परवानगी असतानादेखील गोवंडी मानखुर्द परिसरात अडीचशेहून अधिक मोबाइल टॉवर बसविण्यात आले आहेत. पालिकेच्या एम पूर्व विभागाची हद्द असणाऱ्या गोवंडी मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. या ठिकाणी झोपडपट्टी भागात तीन ते चार मजल्यांची अनधिकृत घरे बांधण्यात आली आहेत. पाणी माफिया, वीज माफिया व भूमाफिया यांची या ठिकाणी दहशत आहे. यामुळे येथे वारंवार आगी लागण्याच्या तसेच घरे कोसळण्याच्या घटना घडत असतात.
एकीकडे अनधिकृत धंदे तर दुसरीकडे डम्पिंग ग्राउंडमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोकादायक बनले आहे. अनेकांना क्षयरोग, तर कुपोषणाचेदेखील प्रमाण वाढले आहे. या सर्व समस्यांच्या विळख्यात या भागातील लोक सापडले असताना आता त्यात मोबाइल टॉवरची भर पडली आहे. या अनधिकृत टॉवरवर कारवाईचे आश्वासन देऊन दीड वर्ष उलटूनही अद्याप कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनधिकृत मोबाइल टॉवरवर तत्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसेचे मानखुर्द, शिवाजीनगर विधानसभा क्षेत्राचे उपविभाग अध्यक्ष सतीश वैद्य यांनी दिला आहे.
गोवंडी मानखुर्द परिसरात झोपडपट्टीतल्या गल्लीबोळात मोबाइल टॉवर बसविण्यात आल्याने आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरामध्ये केवळ ३६ मोबाइल टॉवर्सला परवानगी आहे. असे असूनदेखील येथे २५०हून अधिक टॉवर्स बसविण्यात आले आहेत. सतीश वैद्य यांनी याबाबत मागील दोन वर्षांपासून तक्रारी केल्या मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी एम पूर्व विभागाच्या वतीने या टॉवर्सवर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र दीड वर्ष उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या अनधिकृत टॉवरवर तत्काळ कारवाई केली नाही तर मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा वैद्य यांनी दिला आहे.