मुंबई - नोकरदार महिला दुहेरी भूमिका बजावत असते. ती यशस्वीरीत्या करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखते. त्यामुळे नोकरदार महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय घरगुती सेवेचा दावा करू शकत नाही, हा विमा कंपनीचा दावा अमान्य करीत उच्च न्यायालयाने कार अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना लवादाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेत ३७ लाख ८८ हजार ११६ रुपयांची वाढ केली. ३ जानेवारी २०११ रोजी सांगलीहून पुण्याला येत असताना माधुरी पाटील यांच्या कारला दुसऱ्या कारची धडक बसली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी मोटार अपघात न्यायाधीकरणाकडे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि कारमालकाविरोधात तक्रार करत ३ कोटी ६९ लाख २० हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली. मात्र, न्यायाधीकरणाने १ कोटी ३१ लाख ३७ हजार १७१ रुपये नुकसानभरपाई म्हणून पाटील कुटुंबीयांना देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. त्याविरोधात पाटील कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली.
विमा कंपनीने माधुरी या नोकरदार महिला असल्याने त्यांच्या घरगुती सेवेचे मूल्यमापन केले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद न्यायालयात केला. मात्र, न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विमा कंपनीचा युक्तिवाद फेटाळला.
'आईचे प्रेम पैशातून मोजू शकत नाही'पाटील यांच्या मुलांनी आईच्या प्रेमापासून वंचित राहिल्याबद्दल न्यायालयाने म्हटले की, आईचे प्रेम पैशात मोजू शकत नाही. मुलांना आई देत असलेल्या सेवेचे मूल्यांकन करत नऊ लाख रुपये 'घरगुती सेवे अंतर्गत न्यायालयाने विमा कंपनीला देण्याचे आदेश दिले. अन्य शीर्षकांखाली न्यायाधीकरणाने कमी दिलेली रक्कम वाढवीत न्यायालयाने १ कोटी ६९ लाख २५ हजार २८७ रुपये पाटील कुटुंबीयांना देण्याचे आदेश दिले.
न्यायालय म्हणाले...- एक गृहिणी विविध घरगुती कामे करते. स्वयंपाक करणे, कपडे धुणे, कुटुंबीयांची काळजी घेणे, मुलांचे संगोपन, पालनपोषण करणे, त्यांच्या इच्छा- आकांक्षांची पूर्ती करणे.- एक महिला नोकरी करते, याचा अर्थ असा नाही की, ती तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करते. उलट, ती घर आणि करिअरचा समतोल राखते.- नोकरदार महिला दुहेरी भूमिका निभावत असते. ती अधिक तास काम करते. ती घरापासून दूर असली तरी ती सतत कुटुंबीयांच्या संपर्कात असते.- कुटुंबातील सदस्य जेवले की नाही? मुलांनी अभ्यास केला की नाही? याकडे तिचे लक्ष असते. त्यामुळे विमा कंपनीने गृहिणी आणि नोकरदार महिलेला 'घरगुती सेवा' या शीर्षकाखाली केलेला फरक चुकीचा आहे, असे खंडपीठाने म्हटले.