लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काळाचौकीतील एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्याने बँकेच्या पैशातून क्रिप्टो करन्सी हे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे तो बेटिंग करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्याने बँकेतून काढलेली रक्कम स्वतःच्या तसेच बेटिंग ॲपमधील खातेधारकांच्या खात्यावर जमा केली. काही खातेधारक हे क्रिप्टो करन्सीमध्ये बेटिंग करताना लिंकद्वारे गावकरने एनईएफटीद्वारे रक्कम जमा केलेली असल्याचे उघड झाले. यामध्ये बँकेची दीड कोटीची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी कर्मचारी जयेश गावकर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
अधिकारांचा केला गैरवापर बँकेच्या प्रशासकीय केंद्रीय प्रक्रिया विभागातील (सी.पी.डी.) व्यवस्थापक अमृत बिरवटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. बिरवटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावकर हा त्यांच्या बँकेत मार्च २०१२ पासून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०१६ पासून बँकेच्या सी.पी.डी. विभागात कारकून म्हणून कार्यरत असताना, अधिकारांचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याने, बँकेच्या जनरल लेजर अकाऊंट सी.पी.डी. विभाग या खात्यातून गेल्या वर्षी १८ आणि १९ सप्टेंबरला एक कोटी ५१ लाख २४ हजार ४०० रुपये रक्कम एनईएफटी/आरटीजीएसच्या माध्यमातून अनधिकृतरीत्या त्यांच्या आणि अन्य काही खात्यांवर ट्रान्सफर केल्याचे समोर आले.
सहकाऱ्यांचे बेकायदेशीर लॉगईनगावकरने केलेल्या व्यवहारांबाबत समजताच बँकेने तपासणी केली असता, गावकरने टेलिग्राम या सोशल ॲपवरून क्रिप्टो करन्सी हे ॲप स्वतःच्या मोबाइलवर डाऊनलोड करून त्याद्वारे ते बेटिंग करत होते. त्यांनी बँकेतून काढलेली रक्कम स्वतःच्या तसेच, बेटिंग ॲपमधील खातेधारकांच्या खात्यावर जमा केली. काही खातेधारक हे क्रिप्टो करन्सीमध्ये बेटिंग करताना लिंकद्वारे गावकरने एनईएफटीद्वारे रक्कम जमा केलेली असल्याचे उघड झाले. गावकरने विनापरवाना व बेकायदेशीररीत्या सहकारी कर्मचाऱ्यांचे लॉगईन आणि पासवर्ड तसेच कर्मचाऱ्यांचे डिजिटल कार्ड / डोंगल वापरून बेकायदेशीररीत्या हे व्यवहार केले होते.
३० लाख गोठवले, ४० लाख घेतलेया घटनेनंतर बँकेने तातडीने कारवाई करत ३० लाख ७७ हजार ९०० रुपये वेगवेगळ्या खात्यात गोठविले, तर गावकर यांनी व्यवहारांची कबुली देत ४० लाख ३१ हजार रुपये परत केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.