ग्राईंडरमध्ये अडकल्याने तरुणाचा मृत्यू; दादरमधील घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:26 IST2024-12-17T11:36:30+5:302024-12-17T12:26:01+5:30

दादरमध्ये एका चायनीच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Employee dies after shirt gets stuck in grinder at Chinese shop in Dadar | ग्राईंडरमध्ये अडकल्याने तरुणाचा मृत्यू; दादरमधील घटना सीसीटीव्हीत कैद

ग्राईंडरमध्ये अडकल्याने तरुणाचा मृत्यू; दादरमधील घटना सीसीटीव्हीत कैद

Mumbai Accident: दादरमधील एका धक्कादायक घटनेत १९ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्राईंडरमध्ये शर्ट अडकल्याने कर्मचाऱ्याचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी चायनीज खाद्यपदार्थांच्या दुकानाच्या मालकावर योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या नसल्याच्या  ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. मृताच्या चुलत भावाने दुकान मालकाविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

मिक्सर ग्राइंडरमध्ये अडकून मृत्यू झाल्याने पोलिसांनी चायनीज दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज यादव असे मृताचे नाव असून, तो दादर येथील नॅशनल डेअरीसमोर असलेल्या एका दुकानात इतर पाच जणांसोबत काम करत होता. १४ डिसेंबर रोजी ही घटना घडल्यानंतर सूरजचा चुलत भाऊ महेश यादव याने दुकानाच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गेल्या सात वर्षांपासून मुंबईत काम करत आहे.  तो सचिन कोठारे याच्या मालकीच्या दुकानात काम करतो. कोठारेच्या दुकानातील कामगार सकाळी ११ ते दुपारी ३ च्या दरम्यान जवळच्या भाड्याच्या खोलीत पीठ मळून आणि भाजी कापून कच्चा माल तयार करत असत. त्यानंतर ते त्यांच्या दुकानात जाऊन चायनीज वस्तू विकत. सुरजशिवाय इतरांना पीठ मळण्याचा फारसा अनुभव नव्हता. तसेच यापूर्वी कधीही न वापरल्याने सूरजला ग्राइंडरबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

"शनिवारी इतर सगळेजण दुकानामध्ये काम करत असताना कोठारेने सूरजला खोलीतून कच्चा माल घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर तो गोदामात गेला पण बराच वेळ झाला तरी परत आला नाही. नंतर कोठारे यांना कोणाचा तरी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला त्या खोलीत जाण्यास सांगितले कारण सूरज ग्राइंडरमध्ये अडकला होता. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला यादवचा अर्धा मृतदेह सापडला. तो ग्राइंडरमध्ये अडकला होता,” असं महेशने पोलिसांना सांगितले.

सूरज यादवला बाहेर काढता येत नसल्याने इतर कामगारांनी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. त्यांच्या मदतीने सूरजला ग्राइंडरमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी सूरजला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर दादर पोलिसांनी इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आणि प्राथमिक चौकशी केल्यानंतर कोठारे यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात. सुरजला मिक्सर ग्राइंडर वापरून पीठ मळण्याचा कोणताही अनुभव नाही हे माहीत असूनही कोठारेने त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, असं पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Employee dies after shirt gets stuck in grinder at Chinese shop in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.