Mumbai St. George Hospital : मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा जवळपास तीन तास लक्ष न दिल्याने मृत्यू झाल्याचे त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी सांगितले. सेंट जॉर्ज रुग्णालयातील या घटनेची सरकारने दखल घेतली असून यासंदर्भात विधिमंडळात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात बुधवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. अनिश कैलास चौहान हा कर्मचारी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कामाला होता. अनिशला घरात डोक्याला दुखापत झाल्याने त्याला टाके घालण्यासाठी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. मात्र बराचवेळ उपचार न मिळाल्याने अनिशचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनिश व्हीलचेअरवर डोक्याभोवती पट्टी बांधून एका नातेवाईकासोबत बसलेला दिसत होता. मृत्यूपूर्वी अनिश त्याच्या नातेवाईकासह तीन तास डॉक्टरांची वाट पाहत होता. डॉक्टरांनी अनुभवी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ऐवजी त्याला तपासण्यासाठी शिकाऊ डॉक्टरला पाठवण्यात आलं असा आरोप अनिशच्या कुटुंबियांनी केला. अनिशच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि त्याच्या सहकाराऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेल्याने अनिशचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री अनिशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
अनिशच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाल्याने नातेवाईकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णालयात अनेक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते. झोन एकचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे आणि एमआरए मार्ग पोलीस स्टेशनचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर कर्तव्यावर असलेल्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अनिशच्या मित्राने सांगितले की, "त्यांनी तीन तास अनिशकडे दुर्लक्ष केले. आम्ही आरएमओ, सीएमओ आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर कठोर कारवाई आणि निलंबनाची मागणी केली आहे. कारवाई होईपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. अपघातग्रस्त वॉर्डमध्ये वेळेवर उपचार करणे ही कोणाची जबाबदारी आहे? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि एखाद्या कर्मचाऱ्यावर वेळीच उपचार होत नसतील तर रुग्णालयात जाणाऱ्या इतरांचे काय? असा सवाल अनिशच्या मित्राने केला.
दुसरीकडे, या रुग्णालयात अनेक गैरव्यवहार झाले असून त्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गैरव्यवहारासंदर्भात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याने रुग्णालय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून बाजूला ठेवलं जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.