मुंबई : मुलुंडच्या एम.टी. अग्रवाल रुग्णालयातील कर्मचाºयाला कोरोनाची बाधा झाली. रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने त्यांना कोविड केंद्रामध्ये पाठवले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात निदर्शने केली.
विजय कुलकर्णी (४८) असे कर्मचाºयाचे नाव होते. शनिवारी रुग्णालयातच ताप आल्याने अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाची व्यवस्था नसल्याने त्यांना नायर रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. तेथे खाट उपलब्ध नसल्याने त्यांना मुलुंडमधील कोविड केंद्रामध्ये दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
कुलकर्णी यांना रुग्णालयातच चांगले उपचार का मिळाले नाहीत, असा सवाल कर्मचाºयांनी केला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे कुलकर्णींचा बळी घेतला असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी काम बंद आंदोलन केले. या रुग्णालयात चार व्हेंटिलेटर बंद असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
रुग्णालयात चार व्हेंटिलेटर सुरू आहेत, जे नवीन आहेत ते आठवड्यात सुरू करणार आहोत. रुग्णालयात आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध असून ती कर्मचाºयांना पुरवण्यात येत आहेत. रुग्णालय प्रशासन कर्मचाºयांची योग्य ती काळजी घेत आहे.- विक्रांत तिकोने, मुख्य अधिकारी, एम.टी. अग्रवाल रुग्णालय