- खलील गिरकरमुंबई : सुमारे ३४-३५ वर्षे कंपनीत काम केल्यावर व एक कुटुंब म्हणून कार्यरत असताना, आज कामाचा शेवटचा दिवस असल्याने निवृत्त होत असलेल्या हजारो कर्मचारी व अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. केंद्र सरकारच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला प्रतिसाद देत, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली, त्यांचा शुक्रवारी कामाचा शेवटचा दिवस होता. इतकी वर्षे काम केल्यानंतर आज अधिकृतपणे या संस्थेशी संपर्क तुटत असल्याची भावना कर्मचाºयांच्या मनात दाटून आली होती. त्याचे प्रतिबिंब कर्मचारी व अधिकाºयांच्या ओलावलेल्या डोळ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते.
बीएसएनएलचे सहायक महाव्यवस्थापक (प्रशासन) उल्हास पायगुडे म्हणाले, ३४ वर्षे सेवा केल्यानंतर बीएसएनएलमधून निरोप घेताना अतिशय दु:ख होत आहे. साडेतीन वर्षांची सेवा उरलेली असताना बीएसएनएलच्या आर्थिक अडचणींमुळे स्वेच्छानिवृत्ती योजनेत सहभागी व्हावे लागले. व्हीआरएसमध्ये समाविष्ट होण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नव्हता, म्हणून अपरिहार्यता म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आमच्यानंतर बीएसएनएल कायम चालू राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कंपनी चालेल की नाही, याची भीती आहे. मात्र, कंपनी कायम चालू राहावी, अशी अपेक्षा पायगुडे यांनी व्यक्त केली.
बीएसएनएलच्या कार्यालय अधीक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या साधना महाडिक म्हणाल्या, आज कामाच्या शेवटच्या दिवशी मन भरून आले आहे. ३६ वर्षे सेवा झालेली असताना व ४ वर्षे सेवा शिल्लक असताना निवृत्त व्हावे लागत आहे. बीएसएनएलसाठी आणखी सेवा करण्याची इच्छा होती. दूरसंचार खात्यात कामाला लागल्यापासून आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर येत आहे. अनेक चांगल्या आठवणी मनात दाटल्या आहेत. या आठवणींच्या आधारे पुढे जगायचे आहे. नवीन हातात बीएसएनएल सुरक्षित राहावे, अशी इच्छा आहे. काम करताना एका मोठ्या कुटुंबात वावरत असल्यासारखे वाटत होते. आता त्यामधून बाहेर पडण्याचे दु:ख आहे, असे महाडिक म्हणाल्या.
एमटीएनएलमध्ये १९८२ पासून कार्यरत असलेले व चार महिन्यांची सेवा उरलेले एमटीएनएल कर्मचारी संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव यांनी एमटीएनएलच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांनी व्हीआरएस घेतल्याने कंपनीची वाताहात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कंपनी व्यवस्थित चालण्यासाठी आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ते कर्मचारी सक्षम असावेत, अन्यथा कंपनी संपुष्टात येण्याची भीती असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नवीन कर्मचारी प्रशिक्षित होर्ईपर्यंत कंपनी टिकविण्यासाठी व कंपनीची सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी काही काळ एमटीएनएलला दैनंदिन कामात मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
एमटीएनएलमध्ये १९८३ पासून कार्यरत असलेले व चार वर्षे सेवा शिल्लक असलेले किशोर केदार म्हणाले, सरकारने ही स्वेच्छानिवृत्ती योजना कर्मचाºयांवर लादलेली आहे. गेल्या वर्षभरापासून वेतन रखडले जात असल्याने कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर काम कसे चालेल, याची कोणतीही योजना प्रशासनाने तयार केली नाही. त्यामुळे एमटीएनएलच्या कामावर मोठा विपरित परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जे कर्मचारी कंत्राटावर नेमण्यात येणार आहेत, त्यांना काही दिवस आमच्यासोबत काम करण्याची संधी देण्याची गरज होती. मात्र, तसे झालेले नसल्याने कामकाजात गोंधळ होण्याची शक्यता केदार यांनी वर्तविली. कर्मचारी निवृत्त होतानाही डिसेंबर व जानेवारीचे वेतन प्रलंबित राहणे लज्जास्पद आहे, अशी खंत केदार यांनी व्यक्त केली.यांनी घेतली स्वेच्छानिवृत्तीएमटीएनएलच्या ८२१० कर्मचारी व अधिकाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून १८०० कर्मचारी, अधिकारी कामावर आहेत. राज्यात बीएसएनएलच्या १३ हजार ६७२ पैकी ८५४४ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली, ५१२८ जण कार्यरत आहेत.