अन्यायी बदल्यांमुळे कर्मचारी त्रस्त
By admin | Published: July 5, 2017 05:23 AM2017-07-05T05:23:28+5:302017-07-05T05:23:28+5:30
वैद्यकीय शिक्षण संचालक विभागामध्ये कार्यरत असलेल्या तृतीय श्रेणीतील सुमारे १८ कर्मचाऱ्यांच्या ऐनवेळी बदल्या करण्यात आल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैद्यकीय शिक्षण संचालक विभागामध्ये कार्यरत असलेल्या तृतीय श्रेणीतील सुमारे १८ कर्मचाऱ्यांच्या ऐनवेळी बदल्या करण्यात आल्या आहेत. अकस्मितपणे काहींना गडचिरोली, नागपूर तर काहींना कोल्हापूर, सांगली अशा दूरवरच्या व गैरसोयीच्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्याच्या परिणाम कौटुंबिक स्वास्थ व पाल्यांच्या शिक्षणावर होणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे संबंधितांच्या बदल्या योग्य त्या ठिकाणी न केल्यास आंदोलनाचा इशारा राज्य कर्मचारी संघटनेने वैद्यकीय संचालकांना दिला आहे. तर त्यासाठी हे कर्मचारी ‘मॅट’मध्ये जाण्याच्या पवित्र्यात आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३१ मे पूर्वी कराव्यात, जेणेकरुन त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर, तसेच कौटुंबिक स्वास्थावर परिणाम न होता बदलीच्या ठिकाणी योग्य पर्यायी व्यवस्था करता येते, असे धोरण आहे. मात्र शैक्षणिक वर्ष सुुरू होऊन महिना उलटल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या १८ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना दूरच्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत राज्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संचालकांची भेट घेवून कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.