Join us

कर्मचारी बसले व्हरांड्यात

By admin | Published: August 07, 2015 1:36 AM

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील जागा राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) कार्यालयाला देण्यास विरोध करत आयटीआय

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील जागा राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) कार्यालयाला देण्यास विरोध करत आयटीआय कर्मचाऱ्यांनी दंड थोपटले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रक काढत आयटीआय कर्मचाऱ्यांना इमारतीमधील पहिला मजला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून रोज अर्धा तास संचालनालयाच्या व्हरांड्यात बसून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.आयटीआय कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कर्मचारी संघटनेने गुरुवारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात प्रधान सचिवांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच मजल्यांच्या इमारतीमधील जागा अपुरी पडत असताना प्रशासनाने १२ वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपावर एमकेसीएलला पहिल्या मजल्यावरील अर्धी जागा दिली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील उरलेली अर्धी जागाही सचिवांनी रुसासाठी खाली करण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयटीआयचा कारभार पाहण्यासाठी पूर्णवेळ संचालक नसल्याने कर्मचाऱ्यांची समस्या ऐकून घेण्यासाठी वाली उरला नसल्याची प्रतिक्रिया संघटनेने व्यक्त केली आहे. नवी मुंबई आणि पुणे येथे कार्यालय उभारल्याने एमकेसीएलला दिलेली जागा शासनाने रुसाला देण्याचा पर्यायही संघटनेने सुचवला आहे. याउलट राज्याचा कारभार हाकणाऱ्या संचालनालयातील २२८ कर्मचाऱ्यांना जागा खाली करण्यासाठी शासन दबाव टाकत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.