Join us  

कर्मचारी प्रवासभत्त्याच्या प्रतीक्षेत

By admin | Published: January 05, 2017 4:10 AM

नेमणुकीचे ठिकाण सोडून प्रशासकीय कामासाठी ८ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या पोलिसांना प्रवासभत्ता देण्यात येतो

मुंबई : नेमणुकीचे ठिकाण सोडून प्रशासकीय कामासाठी ८ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या पोलिसांना प्रवासभत्ता देण्यात येतो. मात्र, गेल्या वर्षभरापासून नायगाव सशस्त्र पोलीस दलातील १०० ते १५० पोलीस कर्मचारी या प्रवासभत्त्यापासून वंचित आहे. नियमित मिळणारा प्रवासभत्ता अचानक बंद केल्यामुळे त्यांच्याकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.मुंबई पोलीस दलात सशस्त्र दलाच्या वरळी, ताडदेव, नायगाव, कलिना हे पाच विभाग आहेत. नेमणुकीच्या ठिकाणांपासून प्रशासकीय कामासाठी ८ किलोमीटरचा प्रवास करून, काम करणाऱ्या पोलिसांसाठी शासनाकडून दिवसाला प्रवासभत्ता दिला जातो. मात्र, नायगाव येथील प्रतिनियुक्तीवर असलेल्या १०० ते १५० पोलीस कर्मचारी या प्रवासभत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारीपर्यंत त्यांना नियमित भत्ता मिळत होता. (प्रतिनिधी)तक्रारींची वाढती संख्याअन्य मुख्यालयात प्रवासभत्त्याची देयके मंजूर होऊनदेखील, ते मिळण्यासाठी पाच ते सहा महिने उलटत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. मुळात देयक पास झाल्यानंतर त्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र, शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका पोलिसांना बसताना दिसत आहे. याबाबत नायगाव विभागाचे पोलीस उपायुक्त एम.के. भोसले यांच्याकडे विचारणा केली असता, ‘शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार प्रवासभत्त्यासाठी पात्र असलेल्यांना नियमित भत्ता मिळत आहे. मुळात नेमणुकीच्या ठिकाणांपासून वरिष्ठांच्या आदेशाने दुसरीकडे काम करत असल्यास, संबधित पोलिसाने त्याची रितसर नोंद नेमणुकीच्या ठिकाणी करणे बंधनकारक आहे. त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळेचा तपशील माहिती पुस्तकात नोंद करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक जण या नियमांकडे दुर्लक्ष करतात. आम्ही कायद्याबाहेर जाऊन काही करू शकत नाही.