मुंबई : औद्योगिक बंदच्या आवाहनाला पाठिंबा देत भारत पेट्रोलियमच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बुधवारच्या भारत बंद मध्ये सहभाग घेत निदर्शने केली. माहूल येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी च्या प्रवेशद्वारा समोर संघटनेने निदर्शने केली व केंद्र सरकार च्या कामगार विरोधी धोरणाचा व भारत पेट्रोलियम विक्रीच्या धोरणाचा निषेध केला.
बीपीसीएलच्या निदर्शनांमध्ये किशोर नायर, सुदर्शन रेड्डी, संदीप उन्कुले, पीडी टिकम, प्रकाश हळदणकर, सुभाष मराठे यांच्या सहित पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.भारतीय रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांनी टांकसाळ मजदूर सभेच्या माध्यमातून निदर्शने केली.
नँशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया (नुसी) च्या पदाधिकाऱ्यांनी नौकावहन क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसह भारत बंद मध्ये सहभागी होत निदर्शने केली. यावेळी नुसीचे अध्यक्ष अब्दुल गणी सारंग, मिलींद कांदळगावकर व पदाधिकारी सहभागी झाले होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँन्ड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, मारुती विश्वासराव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.
केंद्र सरकारची कामगार विरोधी धोरणे कामगार वर्गाच्या मुळावर येऊ लागली आहेत. कामगारांना नामशेष करण्याचा सरकारचा हा प्रयत्न कदापीही खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया पोर्ट ट्रस्ट युनियनचे अध्यक्ष एस. के. शेट्ये यांनी व्यक्त केली. सरकारने भांडवलदारांची तळी उठवण्याऐवजी कामगारांना त्यांचे हक्क मिळतील याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.