बांधकामाच्या नावाखाली बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 05:33 AM2019-01-04T05:33:42+5:302019-01-04T05:33:52+5:30

विद्यापीठातील इमारतींच्या बांधकामातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून याची प्रकरणे मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत.

 Employees are staying in student hostels closed under construction name | बांधकामाच्या नावाखाली बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य

बांधकामाच्या नावाखाली बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य

Next

मुंबई : विद्यापीठातील इमारतींच्या बांधकामातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून याची प्रकरणे मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष आणि भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर येत आहे. याचे नुकतेच समोर आलेले उदाहरण म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मुलांचे एकमेव वसतिगृह़ मागील २ वर्षांपासून हे वसतिगृह बांधकामाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले आहे. मात्र अचानक एका विद्यार्थी संघटनेकडून याची पाहणी करत असताना या वसतिगृहात विद्यापीठाच्या उपाहारगृहातील कर्मचारी वास्तव्यास असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृह हे एकमेव मुलांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण घेणारे तसेच पीएच.डी. करणारे विद्यार्थी राहतात. या ठिकाणी एकूण ८० खोल्या आहेत. या दोन मजली वसतिगृहाच्या दुरवस्थेकडे गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या वसतिगृहाची डागडुजी सुरू केली. त्या वेळी नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले होते; तर या ठिकाणी राहणाºया विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आले होते. २०१८ ते २०१९ या वर्षांतील नवीन विद्यार्थ्यांना हे वसतिगृह मिळणे अपेक्षित होते. मात्र गुरुवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट
दिली असता तेथे उपाहारगृहातील कर्मचारी वास्तव्य करीत असल्याचे समोर आले.
परीक्षा भवन तयार
होऊनही स्थलांतरित नाही
परीक्षा विभागावरील वाढता ताण लक्षात घेता, कर्मचाºयांची वाढती संख्या आणि अपुºया जागेमुळे आता कर्मचाºयांना तिथे बसायला जागा कमी पडत आहे. त्यातच परीक्षा विभागाने अनेक नव्या प्रणाली अवगत केल्याने अद्ययावत कॅप सेंटर उभारण्याचा संकल्प प्रशासनाने निश्चित केला होता. त्यानुसार परीक्षा भवनाची नवीन इमारत बांधून तयार झाली आहे. मात्र, त्यानंतरही परीक्षा विभाग या ठिकाणी हलविण्यात आलेला नाही. परीक्षा भवनातील प्रत्येक मजल्यावर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि इतर कागदपत्रांचा अक्षरश: खच परीक्षा भवनातील प्रत्येक मजल्यावर पडलेला आहे. या ठिकाणी दररोज हजारो विद्यार्थी भेट देत असल्याने त्यांनाही याचा फटका बसतो.

ग्रीन टेक्नॉलॉजी इमारतीत आग
विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील ग्रीन टेक्नॉलॉजी इमारतीत उत्तरपत्रिका ठेवण्यात येतात. लाखोंच्या संख्येने उत्तरपत्रिका तिथे आहेत. त्यांची आॅनलाइन तपासणी केली जाते. त्यासाठी स्वतंत्र यूपीएस सिस्टीम आहे. या यूपीएस सिस्टीमला आग लागून धुराचे लोळ उठले. आग लक्षात येताच अग्निशमन यंत्रे आणण्यासाठी त्यांची धावपळ उडाली. परंतु ग्रीन टेक्नॉलॉजी इमारतीत एकही अग्निशामक नसल्याने शेजारच्या इमारतीमधून त्यांना आणावे लागले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्याही तिथे पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. आग विझली असली तरी विद्यापीठ प्रशासनाच्या निष्काळजीमुळे उत्तरपत्रिकांना आगीचा धोका मात्र कायम आहे.

रानडे भवनाचा स्लॅब कोसळला
मुंबई विद्यापीठातील बºयाच इमारतींची अवस्था जीर्ण झाली असून अनेक इमारतींतील स्लॅब पडले आहेत.
३१ डिसेंबर रोजी रानडे भवन इमारतीच्या स्लॅबला भेगा पडल्याने तो कोसळला आणि ३ विद्यार्थिनी जखमी झाल्या.
या संबंधात सिनेट सदस्य आणि संघटनांनी वेळोवेळी विद्यापीठाकडे पाठपुरावा केला असला तरी अद्याप विद्यापीठाला जाग आली नाही.

मादाम कामा वसतिगृह नावापुरतेच
मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र वर्ष उलटूनही तेथे सोयी-सुविधा, कर्मचारी नाहीत. त्यामुळे वसतिगृह मुलींना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थिनींच्या राहण्यासाठी उभारलेली एवढी मोठी वास्तू केवळ विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळ खात पडून आहे. यापुढे तेथे लवकरात लवकर कर्मचारी आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही ते विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आले नसून उलट तेथे स्पर्धांसाठी बाहेरून आलेले विद्यार्थी वास्तव्यास होते.

विद्यार्थ्यांची सुरक्षा विद्यापीठासाठी महत्त्वाची असल्याने केवळ डागडुजी करणे उपाय नव्हता. त्यामुळे विद्यापीठातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट, ग्रीन आॅडिट आणि सेफ्टी आॅडिट करून घेण्यात आलेले आहे. त्याचा अहवालही आला असून आता त्याप्रमाणे विद्यापीठातील इमारतींचे बांधकाम आणि डागडुजी करून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. यासोबतच ज्या इमारतीचे काही कारणामुळे स्थलांतर होऊ शकले नाही, त्याची कार्यवाहीही लवकरच होईल.
- लीलाधर बनसोड, उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ

विद्यापीठात विद्यार्थी विविध भागांतून शिक्षणासाठी येतात. मात्र येथे येऊन त्यांना दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करावी लागत असेल आणि त्यांच्या जागेवर इतर लोक राहत असतील तर हे विद्यापीठ प्रशासनाचे अपयश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी-सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी.
- अमोल मातेले, अध्यक्ष,
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

Web Title:  Employees are staying in student hostels closed under construction name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.