एसटी बसमधून प्रवास करणारे प्रवासी गळतीमुळे भिजल्यास कर्मचारी घरी; एसटीचे फर्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:10 AM2017-09-24T01:10:52+5:302017-09-24T01:11:06+5:30
रोज एसटी बसमधून प्रवास करणा-या राज्यभरातील लाखो प्रवाशांसाठी खूशखबर आहे. त्यांची आता छत तुटलेल्या, पाणी गळत असलेल्या बसमधून सुटका होणार आहे.
मुंबई : रोज एसटी बसमधून प्रवास करणा-या राज्यभरातील लाखो प्रवाशांसाठी खूशखबर आहे. त्यांची आता छत तुटलेल्या, पाणी गळत असलेल्या बसमधून सुटका होणार आहे. खराब बसेस वापरल्यास, गळक्या बसेसमुळे प्रवासी भिजल्यास कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. गळक्या बसेस न वापरण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिलेले आहेत.
एसटीच्या १६ हजारांवर बस रोज राज्यातील विविध १८ हजार मार्गांवर धावतात. पावसाळा संपण्यास आता काही दिवसांचा अवधी असला तरी या निर्णयाची अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आर्थिक डबघाईस आलेल्या परिवहन महामंडळाचे सर्वाधिक प्रवासी ग्रामीण भागातच आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नेहमी ओरड होत असते. महामंडळाच्या अनेक बसेसचे छत, साईड बॉडी व खिडक्या खराब असल्याने पावसाळ्यात बसमध्ये पाणी टपकत असते. त्यामुळे प्रवास्यांना गळके पाणी अंगावर घेत प्रवास करावा लागत असल्याचे स्थिती आहे. याबाबत नागरिकांतून व्यक्त होत असलेला रोष लक्षात घेवून मंत्री रावते यांनी आता खराब बसेस न वापरण्याची सूचना आगारप्रमुखांना नियंत्रकांना दिली आहे.
बीड विभागात पहिली कारवाई
बीड-लातूर मार्गावर गळकी एसटी सोडल्यामुळे बीड विभागाचे विभाग नियंत्रकांनी संबंधित बसचे काम करणाºया शि.सा.लहाने आणि उ.आ.राऊत यांचे निलंबन केले. तर वरिष्ठ प्रभारक मो.रा.गोरे आणि सहायक कार्यशाळा अधिक्षक म.प.लोढा यांच्यावर सदोष बस मार्गस्थ केल्याप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.