Join us

केईएममधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना ब्रेक देणार

By admin | Published: November 24, 2014 1:22 AM

महापालिकेच्या सफाई कामगारांच्या बरोबरीनेच रोजंदारी सफाई कामगारांचाही रुग्णालय स्वच्छ ठेवण्यात मोठा सहभाग असतो.

मुंबई : महापालिकेच्या सफाई कामगारांच्या बरोबरीनेच रोजंदारी सफाई कामगारांचाही रुग्णालय स्वच्छ ठेवण्यात मोठा सहभाग असतो. मुंबईत डेंग्यूची साथ पसरल्यापासून केईएम रुग्णालयातील हे रोजंदारी सफाई कामगार रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र १ डिसेंबरला त्यांचा ४ महिन्यांचा कालावधी संपत असल्यामुळे त्यांना ब्रेक (सेवाखंड) दिला जाणार आहे. यामुळे केईएमच्या सफाईलाही ब्रेक बसणार आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेत खंड करू नये, असे पत्र रुग्णालय प्रशासनाला युनियनतर्फे देण्यात आले आहे. महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे ३०० ते ३५० रोजंदारी सफाई कामगार आहेत. या कामगारांची सेवा दर चार महिन्यांनी ४ ते ५ दिवसांसाठी खंडित करण्यात येते. केईएम रुग्णालयामध्ये एकूण ९८ रोजंदारी सफाई कामगार आहेत. या कामगारांची सेवा खंड केल्यास त्यांच्या जागी दुसरे कोणतेही कामगार कामाला येत नाहीत. यामुळे १ डिसेंबर रोजी या कामगारांची सेवा खंडित केल्यास त्याचा फटका रुग्णालयातील सफाईला बसणार आहे. रुग्णालयात स्वच्छता ठेवण्यासाठी असे करू नये, असे पत्र रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापासून डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी हे कामगार काम करीत आहेत. डिसेंबरमध्ये चार ते पाच दिवस हे कामगार आलेच नाहीत, तर त्याचा परिणाम स्वच्छतेवर होणार आहे. ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव महेश दळवी यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)