फेरीवाल्यांकडून पालिकेच्या ठेकेदाराचे कर्मचारी घेतात २०० रुपयांचा हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:26 PM2020-12-16T13:26:36+5:302020-12-16T13:28:22+5:30

शहरात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत असतांना या फेरीवाल्यांकडून पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराचे कर्मचारी दिवसाला दिड ते पावणे दोन लाखांची वसुली करीत असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली आहे. या संदर्भात चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे.

The employees of the municipal contractor take an installment of Rs. 200 from the peddlers | फेरीवाल्यांकडून पालिकेच्या ठेकेदाराचे कर्मचारी घेतात २०० रुपयांचा हप्ता

फेरीवाल्यांकडून पालिकेच्या ठेकेदाराचे कर्मचारी घेतात २०० रुपयांचा हप्ता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आधीच शहरात कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. परंतु या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांचे कर्मचारी मुंब्य्रात एका - एका फेरीवाल्यांकडून दिवसाला २०० रुपयांचा हप्ता घेत असल्याचा धक्कादायक आरोप स्थायी समिती सदस्य शाणु पठाण यांनी केला. या संदर्भात आपल्याकडे हप्ता घेतानाचे व्हिडीओ देखील असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. परंतु चौकशी करुन कारवाई करु असेच काहीस थातुर मातुर उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.
             मागील काही दिवसापासून शहरात कोरोनाची अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेनंतर शहराच्या प्रत्येक भागात फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. त्यातही मुंब्य्रातून हद्दपार करण्यात आलेले फेरीवाले पुन्हा रस्त्यावर दिसू लागले आहेत. या फेरीवाल्यांवर थातुर मातुर कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने खाजगी ठेकेदार नेमला आहे, या ठेकादारांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सध्या रोज रोसपणे हप्ता वसुलीचे काम सुरु असल्याचा आरोप पठाण यांनी केला. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. परंतु अद्यापही त्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई मात्र झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंब्य्रात एवढे फेरीवाले आहेत, की दिवसाला २०० रुपये प्रमाणे हे कर्मचारी दिड ते पावणे दोन लाखांचा गल्ला जमवीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे अशा ठेकेदारावर कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी एक प्रकारे हप्ता वसुली करुन या फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचेच काम प्रशासनाकडून तर सुरु नाही ना? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
         दरम्यान याच मुद्याला हात घालत महापौर तथा स्थायी समिती सदस्य नरेश म्हस्के यांनी स्टेशन परिसरात देखील अशाच पध्दतीने काम सुरु असल्याचा धक्कादायक आरोप केला. या भागात आपली नेमणुक व्हावी म्हणून हे कर्मचारी अधिकाऱ्यांना किंवा ठेकेदारांना गळ घालत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार अशा ठेकेदाराची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले. तसेच प्रशासनाकडून देखील असा प्रकार सुरु असल्यास त्याची चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.
 

Web Title: The employees of the municipal contractor take an installment of Rs. 200 from the peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.