मुंबई : नालेसफाईच्या कामाचे तीनतेरा वाजले असल्याने, मुंबईत पाणी हमखास तुंबणार, अशी भीती विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही व्यक्त केली आहे़ यामुळेच की काय, सावधगिरी म्हणून पावसाळ्यात हमखास पाणी तुंबण्याच्या प्रत्येक ठिकाणी एक कर्मचारी तैनात ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ त्यामुळे पाण्याचा निचारा तत्काळ होईल, याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर असणार आहे़पालिका मुख्यालयात आयोजित मासिक आढावा बैठकीत आयुक्त अजोय मेहता यांनी मान्सूनपूर्व कामांची माहिती आज घेतली़ विरोधी पक्षांनी नाल्यांच्या सफाईची पाहणी करून बिंग फोडले़ पश्चिम उपनगरातील नाले अद्यापही गाळात असल्याचे उघड झाल्याने पालिका अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत़ त्यामुळे उरलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्याची ताकीद अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे़तरीही हमखास पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात ठेवण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले़, तसेच प्रत्येक विभागात पाण्याचा निचरा त्वरित होण्यासाठी दोन पंप राखून ठेवण्यात येणार आहेत.त्यासाठी इंधनाचा साठा, पंप आॅपरेटरची व्यवस्था, सर्व पंपाच्या नियमित चाचण्या घेणे, याची सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात खातरजमा करून घेण्याची ताकीद आयुक्तांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)अचानक छापा टाका :नाल्यांची सफाई अनेक भागांमध्ये थंडपणे सुरू आहे़ राजकीय व प्रशासकीय पाहणी दौरे सुरू होताच, ठेकेदार तेवढ्यापुरती कामगार नाल्यांमध्ये उतरवित आहेत, अशा अनेक तक्रारी आहेत़ त्यामुळे विभागात मान्सूनपूर्व कामे करून घेण्यासाठी अचानक छापा टाका, पाण्याची नियमित पाहणी करण्याचे आदेश आयुक्तांनी सहायक आयुक्त व उपायुक्तांना दिले आहेत़अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द-सर्व अधिकाऱ्यांच्या शनिवार व रविवारच्या सुट्ट्याही मान्सूनच्या काळात रद्द करण्यात आल्या आहेत़ -मुंबईत ४० ठिकाणी हमखास पाणी तुंबते. यामध्ये हिंदमाता, सायन रोड २४, मालाड, अंधेरी, मिलन सबवे आदींचा समावेश आहे़ -पावसाच्या पाण्याचा निचारा करण्यासाठी २९२ पंप या वर्षी तयार ठेवण्यात येणार आहेत.
पाणी तुंबणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पालिकेचा कर्मचारी
By admin | Published: June 05, 2016 1:22 AM