आरेतील पालिकेच्या ६० शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:05 AM2019-06-18T01:05:17+5:302019-06-18T01:05:21+5:30
आरे कॉलनीच्या महापालिकेच्या शाळा संकुलात कार्यरत असणाऱ्या सर्व ६० शिक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : आरे कॉलनीच्या महापालिकेच्या शाळा संकुलात कार्यरत असणाऱ्या सर्व ६० शिक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही. त्यासाठी पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. ही शाळा दुर्गम भागातील असून येथे बायोमेट्रिक हजेरीसाठी बसविलेले मशीन नेटवर्क नसल्याने काम करत नाही. त्यामुळे हजेरी पुस्तकावरच नोंदवली जाते. शाळेत कार्यरत असणाºया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे वेतन रखडले आहे. ते मिळविण्यास खेटे घालावे लागत आहे.
आरे कॉलनीतील महापालिकेच्या सदर संकुलातील शिक्षकवर्ग प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहे. आदिवासी पाड्यामध्ये काम करणाºया शिक्षकांना वेळच्या वेळी पगार दिला जात नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी, पी/दक्षिण यांच्याकडे असून त्यांनी ती झटकली आहे, असा आरोप येथील शिक्षकांनी केला.
या प्रकरणी पी दक्षिण विभागाच्या शिक्षण विभागाच्या साहाय्यक प्रशासकीय अधिकारी निशा यादव यांनी सांगितले की, आपण या प्रकरणी पाठपुरावा केला आहे. शिक्षकांच्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनाची फाइल पालिका आयुक्तांकडे आहे. ही शाळा दुर्गम भागात असल्याने येथे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे जोवर इंटरनेट सुविधा मिळत नाही, तोपर्यंत येथील शिक्षक व कर्मचाºयांची पटलावरील हजेरी ग्राह्य धरण्यात यावी या आपल्या प्रस्तावाला पालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे येथील शिक्षकांचे पगार यापुढे रखडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.