एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 9 महिने प्रसूती रजा, दिवाकर रावते यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 08:38 PM2017-08-28T20:38:26+5:302017-08-28T23:57:14+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या महिला कर्मचा-यांना आता 9 महिने प्रसूती रजा मिळणार आहे. सध्या मिळणा-या हक्काच्या प्रसूती रजेबरोबर आता तीन महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
मुंबई, दि. 28 - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या महिला कर्मचा-यांना आता 9 महिने प्रसूती रजा मिळणार आहे. सध्या मिळणा-या हक्काच्या प्रसूती रजेबरोबर आता तीन महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचा-यांना शासकीय नियमानुसार 26 आठवड्यांची प्रसूती रजा दिली जाते. मात्र, आता यामध्ये अतिरिक्त वाढ करण्यात आली असून मातृत्वानंतर महिलांना मुलाच्या संगोपनासाठी 9 महिने पगारी रजा देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा परिवहनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परिपत्रक जारी केले असून महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची म्हणजेच 6 महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. ती रजा कधी घ्यायची हा संबंधित महिला कर्मचाऱ्याचा निर्णय असतो. बहुतांश महिला मुलाच्या जन्मानंतर बालसंगोपनासाठी या रजेचा वापर करतात. मात्र प्रसूतीपूर्व रजा मिळत नसल्याने एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना गरोदर अवस्थेतच प्रवास करावा लागतो. त्यामुळे आता अतिरिक्त तीन महिन्यांची प्रसूती रजा देण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.