टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना हवीय राज ठाकरेंची 'पॉवर'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 09:09 AM2019-02-06T09:09:40+5:302019-02-06T09:12:26+5:30
टाटा पॉवरचे कर्मचारी उद्या घेणार राज ठाकरेंची भेट
मुंबई : मुळशी, मावळ, भिरा, खोपोली या भागातील २५० गावांतील सुमारे १५०० कर्मचाऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत न्यायासाठी मंगळवारी कृष्णकुंजवर धाव घेतली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजताची वेळ दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांचे नेते शिवाजी भागवत यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भागवत म्हणाले की, राज्यातील तीन धरणांसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना त्याच प्रकल्पावर कंत्राटी स्वरूपात कामासाठी घेण्यात आले होते. मात्र १९९४ साली कंत्राटी पद्धतीने नवीन कामगार कामावर घेत या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. कामगारांच्या पुनर्वसनासाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाकडून देण्यात आल्याचा दावा कामगारांनी केला आहे. मात्र त्याची पूर्तता काही झालेली नाही. गुरु वारी ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या भेटीमध्ये ठोस निर्णय झाला नाही, तर रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा कामगारांनी दिला आहे.