मनीषा म्हात्रे, मुंबईनिवृत्तीच्या वाटेवर असलेल्या मुंबई पोलीस दलातील १०७ अंमलदार, फौजदारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाच्या वरळी, ताडदेव, नायगाव, कलिना तसेच मरोळ येथे कार्यरत असलेल्या तब्बल १०७ पोलिसांना वेतनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ ओढवली आहे. . नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाल्यानंतर प्रशासनाला या पोलिसांच्या नियुक्तीच्या ठिकाणाबाबत संभ्रम निर्माण झाला. जून महिन्यात या पोलिसांना नोटिसा पाठवून ही माहिती मिळत नसल्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. कागदपत्रे देऊनही काहीही उपयोग झाला नाही. सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी त्यांना अद्याप जून, जुलै आणि आॅगस्ट या तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. दरम्यान, तांत्रिक बाबीमुळे विलंब झाला असून, शुक्रवारपर्यंत त्यांचा पगार होईल, अशी माहिती पोलीस प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप सावंत यानी दिली.
अंमलदार, फौजदारांना वेतनाची प्रतीक्षा
By admin | Published: September 23, 2015 1:54 AM