हातचे घर निसटण्याची गिरणी कामगारांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:02 AM2018-08-25T03:02:42+5:302018-08-25T03:18:23+5:30

अर्जांची छाननी तापदायक; खोट्या अर्जदारांना रोखण्याचा म्हाडाचा प्रयत्न

Employers afraid of hitting their house | हातचे घर निसटण्याची गिरणी कामगारांना भीती

हातचे घर निसटण्याची गिरणी कामगारांना भीती

googlenewsNext

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीत ज्या गिरणी कामगारांना घरे लागली आहेत त्यांनी नियमानुसार या घरांची रक्कम भरली, त्यासाठी काढलेल्या कर्जांचे हप्तेही सुरू झाले; मात्र त्यांना अजून घरांचा ताबा मिळालेला नाही. अशातच यापुढे आधी अर्जाची छाननी करून नंतरच गिरणी कामगारांच्या घरांसाठी लॉटरी जाहीर करू, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. मात्र, घर लागलेल्या अनेक गिरणी कामगारांचे कोड, पत्ते, नंबर, दाखले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे उद्या अर्जांची छाननी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागून हातचे घरही निसटेल अशी भीती गिरणी कामगार, त्यांच्या वारसदारांना सतावत आहे. तर या छाननीद्वारे खोट्या अर्जदारांना रोखण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.
गिरणी कामगारांना हक्काच्या घरासाठी करावी लागणारी प्रतीक्षा पाहता यातून मार्ग काढण्यासाठी गिरणी कामगारांच्या महत्त्वाच्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी आक्रमक धोरण अवलंबत म्हाडाविरोधात आंदोलन उभे केले. त्याची दखल घेत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी गिरणी कामगार नेत्यांसोबत तातडीची बैठक घेऊन येणाºया अडचणी दूर करण्यासाठी लॉटरीमधील अर्जाची छाननी आधी करून नंतर लॉटरी काढण्याची महत्त्वाची घोषणा नुकतीच केली. मात्र, या घोषणेमुळे या कामगारांपुढे आता तांत्रिक बाबींच्या पूर्ततेचा नवा अडसर निर्माण झाला आहे. दुसरीकडे खोटे अर्जदार रोखण्यासाठी छाननी गरजेचे असल्याचे म्हाडाचे मत आहे.
आतापर्यंत म्हाडाच्या घरासाठी अर्ज केलेल्या गिरणी कामगारांची संख्या १ लाख ७५ हजार आहे. त्यातील फक्त ११ हजार ९७६ गिरणी कामगारांनाच हक्काचे घर मिळाले आहे. पनवेलमधील मौजेकोन भागात एमएमआरडीएची घरे बांधून तयार आहेत. पण यासाठी सरकारने लॉटरी घोषित केलेली नाही. दुसरीकडे आतापर्यंत मे २०१६ मध्ये २,६३४ तर डिसेंबर २०१६ मध्ये २,४१७ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. ज्या गिरणी कामगारांना या लॉटरीत घरे लागली त्यांनी नियमानुसार या घरांची रक्कमही भरली. मात्र अद्याप त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. या गिरणी कामगारांपैकी काहींचे वारसदार मुंबई सोडून बाहेरगावी गेले आहेत, अनेकांना एकाच वेळी दोन घरे लागली आहेत. अनेक गिरणी कामगारांचे कोड, पत्ते, नंबर, दाखले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. किंवा ही माहिती कुठून मिळेल, हे कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे उद्या अर्जांची छाननी करताना या गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसदारांना या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागून हातचे घरही लॉटरीतून निसटेल अशी भीती आहे.

तत्काळ घरे देण्याची मागणी
म्हाडाने सर्व माहितीचा अट्टहास न धरता एखाद्या अर्जदार गिरणी कामगाराकडे आवश्यक ती माहिती गरजेपुरती असल्यास त्याचा अर्ज वैध मानून त्याला घर मिळवून देण्यात मदत करावी, अशी मागणी दत्ता इस्वलकर यांनी म्हाडाकडे केली आहे.
तसेच आधीच्या लॉटरीत घर लागलेल्या गिरणी कामगारांना तत्काळ घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी आग्रहाची मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Employers afraid of hitting their house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई