एम्प्लाॅयमेंट एक्स्चेंज मृतावस्थेत; नोकर भरतीसाठी पोर्टल सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:05 AM2021-04-10T04:05:52+5:302021-04-10T04:05:52+5:30
मुंबई : तरुणांना उपलब्ध रोजगाराची माहिती मिळावी यासाठी एम्प्लाॅयमेंट एक्स्चेंजची स्थापना करण्यात आली होती. मात्र आज घडीला एम्प्लाॅयमेंट एक्स्चेंज ...
मुंबई : तरुणांना उपलब्ध रोजगाराची माहिती मिळावी यासाठी एम्प्लाॅयमेंट एक्स्चेंजची स्थापना करण्यात आली होती. मात्र आज घडीला एम्प्लाॅयमेंट एक्स्चेंज मृतावस्थेत गेल्यासारखे दिसत आहे. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न बिकट होऊ लागला असल्यामुळे खासगी, सरकारी तसेच निमसरकारी क्षेत्रातील उपलब्ध रोजगाराची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्य शासनाच्या अधिपत्याखाली अधिकृत एचआर पोर्टल सुरू करण्याची मागणी बेरोजगार युवा समितीने सरकारकडे केली आहे.
कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव तसेच आर्थिक आघाडीवरील मंदीची स्थिती यामुळे बेरोजगारीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. राज्यातील विविध उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शेतीसाठी लागणारी उपकरणे, हॉटेल उद्योग, टूर आणि ट्रॅव्हल्स, वैद्यकीय सुविधा आणि रुग्णालये, वाहने आणि त्यांचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, बांधकाम उद्योग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्मिती इत्यादी क्षेत्रांत आज मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. पण, त्याची पूर्ण माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध होत नाही. नीट नियोजन केल्यास या क्षेत्रातून दरवर्षी साधारण पाच लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे राज्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकेल. त्यामुळे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या माध्यमातून शासकीय नोकरभरती पोर्टल सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. खाजगी क्षेत्रातील नोकरभरतीही याच पोर्टलच्या माध्यमातून करण्याबाबत नियमावली तयार करावी, असे म्हटले आहे.