एक होता आमदार... पत्नी जायची रोजगार हमीवर; विरोधक म्हणत ‘दिशपिंड्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:10 PM2024-04-08T12:10:05+5:302024-04-08T12:10:05+5:30

तोरणाला अन् विशेषत: मरणाला पोहोचणार म्हणजे पोहोचणार अशी त्यांची आगळी ख्याती होती

Employment guarantee for wife Jaya; Opponents say 'Dishpindya', ex MLA Kisanrao Bankhele | एक होता आमदार... पत्नी जायची रोजगार हमीवर; विरोधक म्हणत ‘दिशपिंड्या’

एक होता आमदार... पत्नी जायची रोजगार हमीवर; विरोधक म्हणत ‘दिशपिंड्या’

 यदु जोशी

सुरुवातीच्या काळात ते ट्रकवर क्लीनर होते, ड्रायव्हर होते. त्यावेळी हा माणूस एक दिवस आमदार, खासदार होईल असे कोणाला म्हणजे कोणालाच वाटले नव्हते. पुढे मंचर या त्या वेळच्या छोट्या गावातील राजकारणात ते रस घेऊ लागले, सरपंच झाले अन् मग त्यांनी मागे वळून बघितले नाही. धोतर, सदरा अन् टोपी,  दाढी,  मिळेल ते खाणार, अंग टेकायला जागा असेल तिथे राहणार. किसनराव बाणखेले यांच्याकडे धनबळ नव्हते. त्यांच्यातील एका साध्या, सरळ माणसावर प्रेम करणारे हजारो लोक हेच त्यांचे बळ होते. सामान्य माणसांशी त्यांची नाळ एकदम घट्ट होती. १९८९ च्या निवडणुकीत तेव्हाच्या खेड मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचा पराभव केला, त्याआधी ते आंबेगावचे तीन वेळा आमदार राहिले. 

तोरणाला अन् विशेषत: मरणाला पोहोचणार म्हणजे पोहोचणार अशी त्यांची आगळी ख्याती होती. दशक्रिया विधीला ते बरोबर पोहोचायचे, कुटुंबाचे सांत्वन करायचे. त्यांचे विरोधक त्यांची म्हणूनच ‘दिशपिंड्या’ म्हणजे पिंडीवर पोहोचणारा म्हणून हेटाळणी करायचे, पण त्याची ते चिंता करत नसत. कोणता कार्यकर्ता आपल्या पाया पडला आणि कोण पाया पडत नाही याचा मनोमन हिशेब अनेक नेते आज ठेवतात आणि त्यानुसार कार्यकर्त्यांचा हिशेबही करतात. बाणखेले यांचे याच्या अगदी उलट होते. ते इतके विनम्र होते की कुठेही गेले की लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सर्वांच्या पाया पडायचे. माणूस आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे हे पाहून पाया पडण्याची त्यांची वृत्ती नव्हती. त्यांच्या निवडणुकीसाठी लोकच वर्गणी करायचे. लोकांनी त्यांना नेता केले, पण त्यांनी स्वत:तील कार्यकर्ता कधीही मरू दिला नाही. बैलगाडा शर्यतीत स्वत:च माइकवरून घोषणा करायचे. लोकांना त्यांचा हा साधेपणा भावायचा. 

ते नेते म्हणून चांगले स्थिरावले होते तेव्हाचा हा प्रसंग. एका शासकीय विश्रामगृहात ते थांबले होते. तिथे काँग्रेसचे काही कार्यकर्ते आले आणि ही रूम आमच्यासाठी बुक केली आहे, असा वाद घातला. बाणखेलेंनी कोणताही वाद न घालता रूम रिकामी करून दिली. ते लोकसभेला उभे राहिले तेव्हा, ‘धोतर चालले दिल्लीला’अशी विरोधक त्यांची खिल्ली उडवत. त्यावर, सगळी धोतरवाली माणसे (साधी माणसे) मला नक्कीच दिल्लीत पोहोचवतील असे ते आपल्या लोकांना सांगत. कोणतीही जत्रा असली की तिथे पोहोचत. ज्याही जत्रेत जात तिथल्या देवाचे नाव घेऊन सांगत, माझ्या आईला मूलबाळ होत नव्हते, तिने या देवाचा नवस केला अन् मी झालो, लोक टाळ्या वाजवत. जनसंपर्कासाठी त्यांनी तमाशाही सोडला नाही. ते रात्री उशिरा तमाशात जात, तेथील कलावंतांशी, जमलेल्या लोकांशी बोलत, मग तमाशावाले त्यांचा सत्कार करत. 
 

Web Title: Employment guarantee for wife Jaya; Opponents say 'Dishpindya', ex MLA Kisanrao Bankhele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.