मुंबई : नाइटलाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. नाइटलाइफमुळे बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया तरुणांनी दिली.पब, हॉटेल्स्, मॉल २४ तास खुले राहिल्याने एक पाळी वाढेल. त्यामुळे या पाळीत काम करण्यासाठी जास्त मनुष्यबळ वाढविण्यात येईल. नाइटलाइफद्वारे रात्रीची पार्टी करणे, फिरणे नागरिकांना सोईस्कर होणार असल्याची प्रतिक्रिया कांदिवली येथील रहिवासी मयूर पवार यांनी दिली.विक्रोळी येथील केतन केदारे यांनी सांगितले की, रात्रभर विजेचा आणि इतर संसाधनांचा जादा वापर होईल. नाइटलाइफमुळे निसर्गाला धोका निर्माण होऊ शकतो. तर, गोरेगाव येथे राहणारी राणी शिरसाठ हिने सांगितले, धकाधकीच्या जीवनात एकमेकांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. रात्रीच्या वेळी दुकाने, मॉल्स् येथे जाऊन एकमेकांना वेळ देणे शक्य होईल. मात्र नाइटलाइफमध्ये सुरक्षेवर भर देणे आवश्यक आहे.वांद्रे येथे राहणारे कृष्णा बनसोडे यांनी सांगितले, नाइटलाइफमुळे आपली दिनचर्या बदलून जाईल. कारण काही तरुण कामानिमित्त रात्रीची नोकरी निवडतील. यासह फिरण्यासाठी रात्रीची वेळ निवडतील. अशाने तरुणांचे रात्री जागरण होईल आणि दुपारी ते झोपतील. परिणामी, आपली दिनचर्या बदलून जाईल.
‘मायानगरीतील नाइटलाइफमुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:12 AM