Join us

बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगार संधी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 10:46 AM

इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात काम मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई : इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात काम मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्रायलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन लोढा यांनी केले आहे. फ्रेमवर्क, शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

निवड झालेल्या व्यक्तींना इस्रायलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात काम मिळावे यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. प्रत्येक कामगाराला दरमहा १.४ लाख रुपयांपासून ते २ लाखांपर्यंत वेतन मिळेल. 

काय आहेत निकष? - या पदासाठी २५ ते ४५ वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. - उमेदवाराने  किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल, तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्रायलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा.- अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. - अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी आणि ८२९१६६२९२० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :मंगलप्रभात लोढाभाजपाइस्रायल