आरेच्या आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण शिबीर
By मनोहर कुंभेजकर | Published: February 5, 2024 08:47 PM2024-02-05T20:47:26+5:302024-02-05T20:47:54+5:30
आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे हा या शिबिराचा उद्देश होता.
मुंबई- गोरेगाव पूर्व आरे येथील जीवाचा पाडा ,नवा पाडा या आदिवासी पाड्यांमध्ये महिला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि ठाकूर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून या आदिवासी पाड्यांमध्ये महिला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. महाराष्ट्रातील आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे हा या शिबिराचा उद्देश होता.
आदिवासी पाड्यातील महिलांच्या हातांना काम नाही, त्यामुळे त्यांचा घरातला आर्थिक गाडा हा कोलमडतो.आदिवासी महिलांना रोजगार मिळावा त्यातून त्यांचं घर सुरळीत चालावे, त्यांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील आदिवासी महिलांसाठी कार्यरत आहे अशी माहिती या संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे यांनी दिली.
आरे येथील जिवाचा पाडा व नवा पाडा येथील तब्बल 55 ते 60 महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. महिलांना या कार्यशाळेत मोत्यापासून विविध वस्तू बनविण्यासाठी शिकवल्या गेल्या. ठाकूर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. संगीता व्हटकर यांनी या महिलांना प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणाचा महिलांना भविष्यात खूप उपयोग होईल आणि त्या सक्षम बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांचे आणि संस्थेचे त्यांनी आभार मानले.
यापुढेही वेगवेगळे प्रशिक्षण मुंबईसह राज्यातील आदिवासी पाड्यांमध्ये आयोजित केले जाणार असल्याची माहिती
सुनीता नागरे यांनी दिली.
यावेळी आदिवासी पाड्यातील आदिवासी समाजसेविका शमा काळसेकर व दीपिका माळी यांनी सुद्धा पाड्यातील महिलांना प्रशिक्षण दिल्याबद्दल अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था व ठाकूर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांचे आभार मानले.