मुंबई : महिला उद्योजकांचे समूह तयार करून शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने ते सक्षम करणे दारिद्र्य निर्मूलनासाठी अत्यावश्यक आहे, असे मत द नज इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अतुल सतिजा यांनी व्यक्त केले.
‘प्रगती’ या महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सच्या समूहाचा गौरव करण्यासाठी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या विशेष संमेलनात ते बोलत होते. डिजिटल प्लॅटफॉर्म्स, निधी, मेंटॉरशिप याद्वारे महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी मेटा बांधील असून, अधिकाधिक महिलांमध्ये व्यवसाय करण्याची तसेच वाढवण्याची क्षमता निर्माण झाल्यास देश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या बळकट होईल, असे मेटा इन इंडियाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यावेळी म्हणाल्या. द नज इन्स्टिट्यूट आणि मेटाने आयोजित केलेल्या या संमेलनाला कॉर्पोरेट, सरकार, सामाजिक उद्योजकता आदी क्षेत्रांतील १२०हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. मेटा आणि द नज इन्स्टिट्यूट यांनी २०२१ मध्ये सुरू केलेल्या ‘प्रगती’ या उपक्रमाद्वारे आजवर स्त्रियांच्या नेतृत्वाखालील २९ ना नफा तत्त्वावरील स्टार्टअप्सना सहाय्य पुरविण्यात आले आहे.
मेंटॉरिंग प्राप्त करण्याची संधीही दिली जाते :
महिला केंद्री उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, समुदायकेंद्री उद्योजकतेचे भवितव्य अशा विषयांवर संमेलनात चर्चा झाली. लाइटबॉक्सचे संदीप मूर्ती, फ्रेशमेन्यूच्या रश्मी डागा, माणदेशी बँकेच्या चेतना गाला सिन्हा, ब्रँड युनिलिव्हर आणि सस्टेनिबिलिटीचे प्रशांत व्यंकटेश, फ्रंटियर मार्केट्सच्या अजैता शहा, स्टार्टअप या उद्योग समूहाच्या मनीषा गुप्ता, रिलायन्स फाउंडेशनच्या डॉ. वनिता शर्मा आदींनी या विषयांवर विचार व्यक्त केले.
अनेक संस्थांचा समावेश :
प्रगती समूहामध्ये मिट्टी कॅफे, सहजे सपने आणि टेकफॉरगुड कम्युनिटी अशा अनेक संस्थांचा समावेश आहे.
उपजीविका सुधारण्याचे व्यापक उद्दिष्ट साध्य करण्याचा भाग म्हणून महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे, कारागिरांचे सक्षमीकरण, आरोग्यसेवेची उपलब्धता आदी कामेही ‘प्रगती’द्वारे केली जातात.
स्त्रियांच्या नेतृत्वाखालील संस्थांना निधी पुरवणे, देणगीदार मिळवून देणे, कायदेशीर सल्ला पुरवणे आदी सहाय्य ‘प्रगती’अंतर्गत केले जाते. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मेंटॉरिंग प्राप्त करण्याची संधीही दिली जाते.