Join us

मालमत्ता शांततेत रिकाम्या करा; एकनाथ खडसेंना बजावली ईडीने नाेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 6:25 AM

या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्याशी संबंधित अन्य तिघांच्या मालकीच्या तात्पुरत्या जप्त केलेल्या मालमत्ता दहा दिवसांत ‘शांततेत’ रिकाम्या करण्याची नोटीस ईडीने खडसे व संबंधितांना जारी केली. 

ईडीचे उपसंचालक अमित भास्कर यांनी जारी केलेल्या या नोटिशीनुसार, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये २५ ऑगस्ट २०२१ रोजी खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तझा बदलावाला आणि मुस्लीम फकरूद्दीन उकानी यांच्या वैयक्तिक तसेच संयुक्त मालकीच्या एकूण ११ स्थावर मालमत्ता तात्पुरच्या स्वरूपात जप्त केल्या होत्या. 

लोणावळा, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई व सुरत येथील या स्थावर मालमत्तांमध्ये भूखंड,बंगले, फ्लॅट आदी मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांचे २५ मे २०२२ रोजी ॲडज्युडिकेशन झाल्यानंतर ३० मे रोजी या मालमत्ता रिकाम्या करण्याची नोटीस ईडीने जारी केली. या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील.

कुणाच्या किती मालमत्ता

एकनाथ खडसे : जळगाव जिल्ह्यातील मेहरूण येथील १०५९.०८ चौरस मीटरचा भूखंड (५० टक्के मालकी), मेहरुण येथेच १०५९ चौरस मीटरचा भूखंड (५० टक्के मालकी)

मंदाकिनी खडसे - मावळ तालुक्यातील तुंगार्ली येथील २९४ चौरस मीटरवर जमीन आणि बंगला, भुसावळ येथील २ हेक्टर भूखंड, नाशिक येथील १३७ चौरस मीटरचा फ्लॅट

इन्सानिया मुर्तुझा बादलावाला - गुजरातेतील सुरत येथे ६५.६० चौरस मीटरचा फ्लॅट

गिरिश चौधरी - मेहरूण येथे ६९७ चौरस मीटर भूखंड, जळगाव जिल्ह्यात १४३६ चौरस मीटर भूखंड (५० टक्के मालकी), मुंबईत मुलुंड येथे ५१९ चौरस फूटाचा फ्लॅट (५० टक्के मालकी), मुलुंड येथेच ४४१ चौरस फुटाचा फ्लॅट (५० टक्के मालकी)

टॅग्स :एकनाथ खडसेअंमलबजावणी संचालनालय