ठाण्यातील कोरोना रुग्णालयातील सेवासुविधांचे सक्षमिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 07:07 PM2020-04-09T19:07:07+5:302020-04-09T19:07:42+5:30
लोकमतच्या वृत्तानंतर रुग्णांना दिलासा देणा-या प्रयत्नांना वेग...
मुंबई - कोरोना रुग्णालय की कारागृह या वृत्तातून ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अनुभव लोकमतने बुधवारी मांडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत इथली रुग्णसेवा सक्षम आणि प्रभावी करण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे. रुग्णांच्या जेवणापासून ते वैद्यकीय सेवांपर्यंत आणि वायफायपासून ते मिनलर वॉटरपर्यंतची सोय इथे केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
ठाणे शहरांतील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील कस्तुरबाच्या धर्तीवर ठाणे सिव्हिल हॉस्पिटल सज्ज करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते. मात्र, प्रत्यक्षात इथे असंख्य समस्या भेडसावत आहेत. सिव्हिल रुग्णालयाची इमारत पाडून नवी इमारत उभारली जाणार असल्याने गेल्या काही महिन्यांत इथे कोणतीही दुरूस्तीची किंवा अन्य आवश्यक कामे केली जात नव्हती. मात्र, आता कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक कामे आता तातडीने सुरू करण्यात आली आहेत. सरकारी मंजूर दरानुसार इथे अन्नपुरवठा केला जात होता. त्याच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यानंतर खासगी कॅटरर्सच्या माध्यमातून गुरूवारी दोन वेळचे सकस जेवण आणि सकाळचा नाश्ता देण्यास सुरूवात केली आहे. तसेच, या रुग्णांना मिनरल वॉटरचा पुरवठा होत असल्याचेही जिल्हाधिका-यांनी सांगितले. इथे दाखल होणा-या रुग्णांना मोबाईलचा आणि लॅपटॉपचा वापर मनोरंजनासाठी करता यावा यासाठी वाय फाय सेवा कार्यान्वीत करण्याचे काम गुरूवारी सुरू होते. तसेच, या वॉर्डमध्ये आता टीव्हीसुध्दा लावण्यात आले आहेत.
इथल्या आयसीयूमध्ये १२ बेड असून व्हेंटिलेटर्ससह मल्टी पॅरा मॉनेटर्ससह अद्ययावत यंत्रसामग्री दाखल झाली आहे. गुरूवारी इथे काही तांत्रिक कामे सुरू होती. संध्याकाळपर्यंत ती पूर्ण होतील असे सांगण्यात आले. रुग्णालयात एकूण ९ अद्ययावत व्हेंटिलेटर्ससह वैद्यकीय कर्मचा-यांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा किटही दाखल झाली आहेत. महिलांसाठी विशेष वॉर्डमध्ये ३५ बेड आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफलाही प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, या कर्मचा-यांना आपापल्या घरी ये- जा करताना होणारा त्रास टाळण्यासाठी त्यांच्या वास्तव्याची आणि जेवणाची सोय नजिकची दोन चांगली हॉटेल आणि शासकीय विश्रामगृहात करण्यात आल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.