मुंबई : रस्त्यालगतचे पदपथ हे पादचाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी असतात. विशेषतः वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णांना पायी चालण्यासाठी सोयीस्कर ते ठरतात. मात्र, सध्या अंधेरी ते कुर्ला रोडवरील हरवला असून त्याबाबत अधिकृत एफआयआर नोंदवून घेण्याची विनंती वॉच डॉग फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांवर अनेक ठिकाणी अधिकृत व अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटले असून त्यांना आंदण दिल्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण अंधेरीकुर्ला रोड व्यापला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी नक्की पदपथ आहे का, होता तर तो आता हरविला असून त्याची अधिकृत तक्रार नोंदवून घ्या, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आले आहे.
फेरीवाला धोरणाचे भिजत घोंगडे :
रस्त्यावर, पदपथावर वाट्टेल तेथे व्यवसाय थाटणाऱ्या फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण आणले होते. मात्र, गेल्या तब्बल नऊ वर्षात या धोरणाची मुंबईत अंमलबजावणी होऊ शकली नाही. गेल्या नऊ वर्षांत धोरणाच्या अंमलबजावणीला अनेक फाटे फुटले. वेगवेगळी कारणे सांगून चालढकल करण्यात आली आणि त्यामुळे मुंबईतील अनधिकृत बांधकामांप्रमाणे फेरीवाल्यांचा प्रश्नही कधीच सुटला नाही.
अंधेरी कुर्ला रोडवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हे पादचाऱ्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमण असून पालिकेने तत्काळ यावर कारवाई करणे आवश्यक आहे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या रस्त्यावरचे हे अतिक्रमण म्हणजे नागरी नियमांचे उल्लंघन आहे - पिमेंटा गॉडफ्रे, वॉच डॉग फाऊंडेशन
अवैध बांधकामे आणि फेरीवाल्यांनी गिळले :
पदपथ हा रस्ते, वीज आणि पाण्याइतकाच मोलाचा विषय आहे. मात्र, काही पोलिस, काही पालिकेचे अधिकारी, काही कंत्राटदार आणि काही नगरसेवकांच्या आशीर्वादाने हे पदपथ अवैध बांधकामे आणि फेरीवाल्यांनी गिळले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असून पदपथावरून चालण्यास जागा नाही म्हणून पादचारी रस्त्यावर येतात, असे वॉच डॉग फाउंडेशन म्हटले आहे.
स्वच्छ, सुरक्षित पदपथ ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिकेची जबाबदारी आहे, पण ती पार पाडली जात नसल्याचा ठपका पालिकेवर सामाजिक संस्थेकडून ठेवण्यात आला आहे. अंधेरी कुर्ला रोडच्या दोन्ही मार्गिका फेरीवाल्यांच्या विळख्यात होत्या, मात्र के पूर्व विभागातील पालिका अधिकारी, पोलिस प्रशासनाला याची दखल घेतली गेली नाही.